विनायक आश्रम (अध्याय ७२)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

विनायक आश्रम (अध्याय ७२)

मदनाला भस्मसात केल्यानंतर शंकरांनी पार्वतीला हिमालयाकडे परत पाठविले आणि आपण कैलासाला निघून गेले. शंकराच्या प्राप्तीसाठी पार्वतीने आपल्या वडिलांच्या परवानगीने घोर तपश्चर्या करून, शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याशी विधीवत विवाहबध्द झाली. मदनाच्या नाशाने सर्व देव, मनुष्यगण यांची कामवासना वर्जित झाली आणि सृष्टी निरर्थक होण्याची वेळ आली.

ईश्वर विवाहाची संधी घेऊन सर्व देवांनी मदनाच्या देहप्राप्तीसाठी शंकरांना विनंती केली. महेश म्हणाले, यापुढे मदनाला देहप्राप्ती होणार नाही, तो चित्तजन्मा म्हणजेच प्रत्येकाच्या मनात राहणारा होईल. असे म्हणताक्षणीच महेशांच्या मनात काम प्रगट झाला आणि सर्वांगसुंदर अशा पार्वतीला पाहून ईश्वराच्या ललाटापासून महातेजस्वी कुमार जन्माला आला. त्याचे नाव ठेवले गेले विनायक. एकदा पर्वताच्या शिखरावर खेळण्यासाठी गेलेला हा मुलगा बऱ्याच उशीराने परत आला. आपला मुलगा गणपती याला पाहून पार्वतीला शंकराचा भास झाला. जेव्हा तिला कळले की, हा आपला पती नसून आपला मुलगा आहे तेव्हा तिने त्याला, विकृतांग हो! असा शाप दिला. काहीवेळाने ईश्वर परत आले आणि त्यांनी पार्वतीला हा कोण आहे असे विचारले? पार्वतीने सर्व हकीकत सांगून हा आपला मुलगा विनायक असल्याचे सांगितले.

ईश्वराने गजाननाला जवळ घेऊन त्याच्या मस्तकावर हात फिरवून त्याला म्हणाले, हे गजानना आईवर राग न धरणे हे तुझ्या हिताचे होईल. तुझे सुंदर रुप परत प्राप्त करण्यासाठी तू गोकर्ण या सिध्द क्षेत्री जा, रुद्रयोनीच्या उत्तरेला अर्धा कोस अंतरावर केतकीच्या सिध्दी देणाऱ्या वनात जाऊन तपश्चर्या कर.

गजाननाच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न झालेले ईश्वर आणि पार्वती देवादिकांसह प्रगट झाले. ईश्वराने गणपतीला विघ्नांचे आणि गणांचे अधिपद प्रदान केले. आपला त्रिशूळ त्याला दिला. ब्रह्मदेवांनी कमळ, विष्णुंनी सुदर्शन चक्र, कामदेवाने बाण, केशवाने गदा, गौरीने निलकमल, रमेने पद्म, सूर्याने पाश, कुबेराने रत्नांनी भरलेला सुर्वणकलश, हिमालयाने शुभवाहन म्हणून मूषक देऊन गजाननाचा विवाह शक्ती नावाच्या विष्णुंच्या मुलीशी लावला. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे गजाननाने ज्या ठिकाणी घोर तपश्चर्या करून मातृशापातून मुक्तता मिळवली तोच हा विनायक आश्रम.


कार्यसिध्दीस नेऊन मोठे ऐश्वर्य प्राप्त करून देणारा हा गोकर्ण क्षेत्रीचा केतकी विनायक आणि विकृतांग.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका