उन्मज्जनी तीर्थ, हरीहरपूर, वैतरणी उत्पत्ती आणि दुर्गा (अध्याय ४०-४१-४२)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

उन्मज्जनी तीर्थ, हरीहरपूर, वैतरणी उत्पत्ती आणि दुर्गा (अध्याय ४०-४१-४२)

कोटीतीर्थाजवळ अजून एक स्थान आहे जेथे स्त्रीरुपधारी विष्णु काम्य अश्या शंभूसह रममाण आहेत. कृतयुगात हिरण्यकश्यपूच्या वंशात खर नावाचा महापराक्रमी राक्षस होऊन गेला. क्रिडावनात विहार करणाऱ्या पार्वतीला पाहून तो अधम राक्षस तिची कामना करू लागला. पार्वतीमातेच्या प्राप्तीसाठी त्याने दोन्ही बाहू वर करून पायाच्या अंगठयावर उभे राहून सहस्त्रावधी वर्षांची तपश्चर्या केली. त्याच्या ह्या तपश्चर्येने त्रिपुरनाशक, त्रिलोचन शंकर प्रसन्न झाले. खराने त्यांना प्रणाम करून, ''हे जगन्नाथा, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो तात्काळ भस्मसात होवो'' असा वर प्राप्त करून घेतला. शिवाने 'तथास्तु' म्हणताच तो महाराक्षस वेगाने भगवान शंकराकडे धावत गेला. त्याचे मनोगत जाणून महादेव त्याप्रदेशातून निघून भगवान विष्णुंच्या नारायणापुराकडे पळाले. त्यांनी  सगळा वृतांत विष्णुंना सांगितला. हे होईस्तोवर खरासुरही तेथे पोहोचला. त्याला बघताच हरि आणि हर हे दोघेही पळू लागले.

पळता पळता विष्णुंनी सर्वांना मोहित करणाऱ्या मायेने उमेपेक्षाही शतगुणांनी अनुपम, सौंदर्यवती मोहिनीचे रुप घेतले. या मोहिनीच्या सौंदर्याने खर मोहीत झाला आणि तिच्या प्राप्तीची अभिलाषा करू लागला. मोहिनी म्हणाली, मी तुझी भार्या होण्यास तयार आहे; परंतु एका अटीवर आणि ती म्हणजे शंकराने दिलेला वर तू मला दिलास तरच. आत्यंतिक कामवासनेने पछाडलेल्या खराने मोहिनीला आपला वर देऊन टाकला आणि तत्क्षणीच मोहिनीने आपला हात खराच्या मस्तकावर ठेऊन त्याला भस्मसात केले.

खराच्या भितीने हरी आणि हर हे दोघेही पाताळात जाऊन लपले होते. त्यावेळी पाताळात रक्त प्रवाहाचा व्रण असलेली धर्मराजाची कन्या, कर्मलोक आणि यमलोक यांची सीमा, सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ असलेली वैतरणी नदी तपश्चर्या करीत होती.

सर्व महानद्या आपल्या निश्चित दिनी निश्चित संकेतस्थळी आपल्या स्वामीला म्हणजेच वरुणाला भजतात. मैत्रिणींबरोबर खेळात मग्न असलेली वैतरणी तिच्या ठरलेल्या वेळेत आपला पतीकडे जाण्यास विसरली. त्यामुळे वरुणाने तिला ''मलीन जलयुक्त रक्तवर्णाची नदी हो'' असा शाप दिला. या उःशापासाठी वैतरणी पाताळात तपश्चर्या करीत होती.  हरि आणि हर यांच्या दर्शनाने ती पापमुक्त होऊन पतीच्या शाश्वत प्रेमाला पात्र झाली.

खरासुराच्या नाशाची बातमी कळताच हरि-हरांसह वैतरणी ज्या ठिकाणी पाताळातून वर आली ते हे उन्मज्जनी तीर्थ.

या तीर्थात उगम पावलेली ही महानदी कोटीतीर्थातून ताम्रगौरीशी संगम होऊन पुढे समुद्रात प्रवेश करते. या नदीत स्नान करणाऱ्यास सर्व तीर्थ स्नानाच्या पुण्यासह सहस्त्र गायी दान केल्याचे पुण्य मिळते.

खरासूराच्या नाशाची कथा कळताच भुवनेश्वर शंकरांना ते मोहिनी रूप बघण्याची इच्छा झाली. अखिल विश्वाचे तत्वज्ञानी असणारे महादेव त्या मोहिनीच्या रुपाने कामवासनेने पिडले गेले आणि शंकरानी त्या रुपाला अलिंगन देऊन क्रीडासक्त अशा त्या दोघांनी एकत्व प्राप्त केले. तेच हे गोकर्णक्षेत्र स्थित अर्धनारीनटेश्वर अथवा हरिहरपुर

या ठिकाणी दिलेल्या दानाने अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि दाता 73 कुळातील लोकांबरोबर स्वर्गप्राप्ती करतो. शुक्ल पक्षातील द्वादशीला श्रवण नक्षत्रात शिवविष्णुंची पूजा अधिक पुण्यप्रद होते. या दोन्ही देवांच्या पुढयात तीन मंडप होते त्यांची नाव वैराग्य मंडप, ज्ञान मंडप आणि मुक्ती मंडप अशी होती. काळाच्या ओघात पहिले दोन मंडप नाहीसे झाले आहेत; परंतु ज्या ठिकाणी मृत्यू आला असता मानव पापमुक्त होऊन श्रेष्ठ पदाला जातो तोच हा गोकर्ण क्षेत्रीचा मुक्ती मंडप.

गोकर्ण क्षेत्री उन्मज्जनी तीर्थाच्या आग्नेय दिशेला पवित्र आणि पापनाशक असे दुर्गास्थान आहे.


महिषासूर नावाच्या अतिबलवान राक्षसाने संपूर्ण पृथ्वी तर जिंकलीच; परंतु स्वर्गावर स्वारी करून दिपालांना पळवून लावून त्यांचाही कारभार स्वतःच्या हातात घेतला. महिषासूरापुढे हतबल झालेल्या देवादिकांच्या सुटकेसाठी विचारविनिमय करीत असलेल्या ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी एक दिव्य शक्तीरुपीणी स्त्री निर्माण केली. तिच्या शक्तीरुपी दर्शनाने देव लोकांत आनंद पसरला. शंकरानी तिला त्रिशूळ, विष्णुंनी सुदर्शन चक्र, वरुणाने शंख आणि फासाची दोरी, अग्नीने भाला, वायुने बाण, इंद्राने वज्रा, यमराजाने ढाल-तलवार, विश्वकर्म्याने परशू आणि चिलखत, हिमवताने सिंह आणि इतर देवदेवतांनी अनेक अस्त्रे आणि आयुधे तिला दिली. सर्वांनी तिची मनोभावे पूजा करून महिषासूराच्या त्रासातून आपली मुक्तता करण्याची विनंती केली. अजिंक्य आणि दुर्गम अशा त्या देवीचे नाव पडले दुर्गा. या दुर्गेने महिषासूराच्या सैन्याचा धुव्वा उडवला. महिषासुराने विविध रुप धारण करत देवी बरोबर लढाई केली. शेवटी त्याने म्हशीचे रुप घेतले. त्यावेळी देवीने तिच्या दहा बाहूने त्याच्यावर फास टाकून त्याला जमिनीवर पाडले, आपला त्रिशूळ त्याच्या छातीत खुपसला आणि तलवारीने त्याचा शिरच्छेद करून त्याला ठार मारले. महिषासूराच्या मृत्यूनंतर ती दुर्गादेवी शतशृङगाच्या तटावर तप आचरू लागली. हरि-हरांच्या वरामुळे ती विध्यांचल पर्वतावर निवास करते आणि एका अंशाने या गोकर्ण क्षेत्री राहते.

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका