गौतमेश्वर, इंद्रेश्वर (अध्याय ८२)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

गौतमेश्वर, इंद्रेश्वर (अध्याय ८२)

एकदा इंद्र, गौतम ॠषींच्या आश्रमात गेला. तिथे तो गौतमांच्या अतिशय सुंदर अहिल्या नामक पत्नीला पाहून फिदा झाला आणि तिच्याशी रममाण होण्याच्या इच्छेने आश्रमातच लपून बसला. दुपारच्या वेळेस गौतम ॠषी फळे आणण्यासाठी वनात गेले आहेत असे बघून इंद्राने गौतमांचे रुप धारण करून अहिल्येकडे रतीसुखाची मागणी केली. अहिल्येने पतीरुपातील इंद्राला दिवसा रती सुखाची इच्छा करणे हे निंद्य, अयशस्वी व नरकपद असे कर्म आहे असे बजावले. कामातूर झालेल्या इंद्रापुढे ते बोलणे व्यर्थ ठरले आणि अहिल्येने आपल्या पतीची इच्छा पूर्ण केली. इच्छापूर्ती नंतर इंद्र आपल्या स्वस्थानी निघून गेला. दुपारच्या वेळेस केलेल्या त्या निंद्य कर्माने लज्जीत आणि खिन्न झालेली अहिल्या आपल्या पर्णकुटीत बसून राहिली.  थोडयावेळाने गौतम ॠषी वनातून परत आले. खिन्न अहिल्येला बघून त्यांनी त्याचे कारण विचारले. अंतर्यामानी गौतम ॠषींना इंद्राचे अपकृत्य कळले. क्रोधीत झालेल्या गौतम ॠषींनी अहिल्येच्या निंद्य कर्माबद्दल ''दहा हजार वर्षे शिळा हो'' असा शाप दिला. अज्ञात वशात झालेल्या चुकीसाठी त्यांनी रामप्रभूंच्या पदस्पर्शाने ''तुझी शापातून सुटका होईल'' असा उःशापही अहिल्येला दिला. पत्नीला शाप देऊन गौतमांनी इंद्रालाही ''तुझ्या पापी शरीराला हजारो छिद्रे पडोत'' असा शाप दिला.

अहिल्येला आणि इंद्राला शाप देऊन गौतम ॠषी तीर्थ यात्रेसाठी आश्रमाबाहेर पडले. पृथ्वर्ीदशन करत करत गौतम ॠषी गोकर्ण क्षेत्री आले. त्या क्षेत्राच्या दर्शनाने परमसंतुष्ट झालेल्या त्यांनी रुद्रयोनीच्या दक्षिणेला आश्रम बांधून शंभूचे लिंग स्थापून, ब्रह्मज्ञान परायण होऊन दीर्घकाळ तप केले. भाद्रपद महिन्यातील नवमीला गौतमेशाची विधीवत पूजा करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे हेच ते गोकर्ण क्षेत्रीचे गौतमेश्वर लिंग.

गौतम ॠषींच्या शापाने संपूर्ण शरीर छिद्राने भग्न झाल्यामुळे इंद्र दुःखी होऊन मेरु पर्वतावरीील एका गुहेत जाऊन लपला. या शापाची बातमी स्वर्गामध्ये इंद्राणी शचीला कळली आणि तिने गौतम ॠषींकडे उःशापाची याचना केली. गौतम ॠषी म्हणाले, परस्त्रीशी संग केल्याने लागणाऱ्या दोषांच्या निवृत्तीसाठी इंद्राला गोकर्ण क्षेत्री तपश्चर्या करण्यास सांग. शचीने ही बातमी इंद्राला सांगितली. इंद्राने रुद्रयोनीच्या आग्नेयेला कुबेरेश्वराजवळ लिंगाची स्थापना करून निर्मल असे तीर्थ बनवून परमसमाधीने ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून, मौन व्रत धारण करून तपश्चर्या सुरू केली. त्याच्या हजारो वर्षांच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेले ईश्वर म्हणाले, हे इंद्रा, तू परस्त्रीसंग दोषाच्या पापातून मुक्त झाला आहेस. कार्तिक महिन्यातील शुध्द दशमीला तीर्थात स्नान करून ज्या लिंगाची पूजा केली असता परस्त्रीसंग दोषाच्या पापातून सुटका होते तेच हे इंद्रेश्वर लिंग आणि इंद्रतीर्थ.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका