दत्तात्रेय आश्रम (अध्याय ७६)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

दत्तात्रेय आश्रम (अध्याय ७६)

कृतयुगामध्ये अत्री नावाच्या महामुनींची अनुसूया नावाची सुंदर पत्नी होती. एकदा नारदमुनी त्यांच्या आश्रमात आले. दोघा पती-पत्नीने त्यांची मनोभावे सेवा केली. एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी नारदमुनी ब्रह्मलोकाला गेले आणि ब्रह्मसदनात जाऊन त्यांनी अनुसूयेच्या अकलंकित पातिव्रत्याची आणि चारित्र्याची भरभरून स्तुती केली. त्या स्तुतीने ब्रह्मा, विष्णु, महेश यांना त्या पतिव्रतेला बघण्याची इच्छा झाली आणि ब्राह्मणांचा वेश घेऊन दुपारच्या वेळेत हे तिघेजण अत्री ॠषींच्या आश्रमात गेले. अनुसूयेने या ब्राह्मणांचे स्वागत केले. त्यांची पाद्य व अर्ध्य पूजा करून त्यांची इच्छा विचारली. तिचे बोलणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, हे सुंदरकांती भद्रे, आम्हांला षडरसयुक्त अन्न हवे आहे आणि विवस्त्र होऊन तू आम्हांला भोजन द्यावेस.

ठीक आहे म्हणून त्या सतीने संपूर्ण  स्वयंपाक केला. त्या ब्राह्मणांच्या पुढयात अन्न वाढून, हातात पाणी घेऊन ती मनात म्हणाली, ''कर्म, मन आणि वाणीने मी पतीशिवाय कोणाचाही विचार केला नसेल आणि हे जर सत्य असेल तर हे ब्राह्मण बालके होऊ देत'' असे म्हणून हातातील पाणी तिने त्या तिघांवर टाकले. पतिव्रतेच्या त्या केवळ जलस्पर्शाने तिन्ही भगवतांची तीन बालके झाली. सती अनुसूयेने नग्न होऊन पंख्याने वारा घालून त्या तिघांना भरवण्याचा प्रयत्न केला. खाऊ शकत नसल्याने स्तनपानाच्या इच्छेने ही तीनही बालके रडू लागली. तीन दिवस त्या पतिव्रतेने मोठया भक्तीपूर्वक व आनंदाने त्या तिघांना अंगावर पाजले.

नारदमुनींनी ही कथा या तिघांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांना सांगितली. वैधव्याच्या शंकेने या तिघी महादेवी महर्षी अत्रींच्या आश्रमात गेल्या आणि पतिव्रता अनुसुयेची स्तुति करून तिच्याकडे पती दानाची मागणी केली. कदर्म ॠषींची कन्या अनुसूया हातात पाणी घेऊन म्हणाली, मी माता, पिता, सासू, सासरे तसेच गुरु यांचे जाणीव पूर्वक पूजन केले असेल, पती, ब्राह्मण आणि देव यांना समानतेने पूजले असेल तर ही तीनही बालके पूर्ववत होऊ देत आणि काय आश्चर्य हातातील पाणी शिंपडताच त्या जलाच्या नुसत्या स्पर्शाने त्या तिन्ही देवांना आपापले मूळ स्वरुप प्राप्त झाले. अनुसुया मातेने ब्रह्मा, विष्णु, महेश्वरांकडे स्वतःच्या अपराधाची क्षमा याचना केली. संतुष्ट झालेले ते तिघेजण अत्री पत्नीला म्हणाले, गेले तीन दिवस आम्ही बाल रुपात भूकेले असताना तू आम्हाला स्तनपान दिल्याने आम्ही तुझे पुत्र होऊ.

ब्रह्मदेवाचा चंद्र, विष्णुंचा दत्तात्रेय आणि शंकराचा दुर्वास असे अंश रुपाने पुत्र झाले. अत्री ॠषींच्या आश्रमात ही तिन्ही मुले वाढू लागली. कालांतराने दत्तात्रेय व दुर्वास हे दोघे मुनीवेश धारण करून ॠषीमुनींसमवेत तीर्थयात्रेला निघाले. ठिकठिकाणची तीर्थे पाहून तीर्थयात्रा करून हे दोघेजण गोकर्ण क्षेत्री आले. प्रथम कोटीतीर्थावर स्नान करून महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्याची यथाविधी पूजा करून त्यांनी गोकर्णावर दीर्घकाळ वास्तव्य केले. कोटीतीर्थाच्या दक्षिणेला दुर्वास मुनींचा आश्रम असून उत्तरेला महामुनी दत्तात्रेयांचा पवित्र आश्रम आहे. त्यांच्या महान तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शंभूमहादेवांनी त्रैलोक्यात जे तीर्थ सर्व सिध्दीदायी होऊन मर्त्य लोकांना ज्ञानप्राप्ती देईल असा आशीर्वाद दिला, तेच हे विहिरीत रुपांतर झालेले दत्तात्रेय तीर्थ, उघडयावर असलेली परम पावन पतिव्रता अनुसूयेचा विग्रह आणि या कथेची साक्ष देणारे, महाबळेश्वराच्या प्रांगणात असलेले हे दत्तात्रयेश्वर.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका