काळभैरव आणि प्रल्हाद आश्रम (अध्याय ७४)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

काळभैरव आणि प्रल्हाद आश्रम (अध्याय ७४)

महादेवाच्या आज्ञेप्रमाणे भैरवाने ब्रह्मदेवांचे शीर कापले खरे; परंतु त्यामुळे भैरवाला ब्रह्महत्येचे पातक लागले. ब्रह्महत्येने पिडीत असा तो भैरव तीर्थ यात्रेच्या निमित्ताने देशोदेशी फिरुनही मुक्त न झाल्याने शंकराच्या आज्ञेनुसार गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे कोटीतीर्थाच्या दक्षिणेला हनुमान मंदिराच्या पूर्वेला दिव्य सहस्त्र वर्षांची तपश्चर्या सुरु केली. ज्या ठिकाणी शंकर प्रसन्न होऊन काळभैरवाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले तेच हे गोकर्णक्षेत्रीचे सर्व अरिष्टांचे नाश करणारे, पापी लोकांना शिक्षा देणारे आणि पुण्यशील लोकांचे रक्षण करणारे काळभैरवेश्वर.

या काळभैरवाच्या आश्रमाच्या पूर्वेला अजून एक अद्भुत स्थान आहे आणि ते म्हणजे नृसिंह स्थान. दितीचा हिरण्यकश्यपू नावाचा महापराक्रमी पुत्र होऊन गेला. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने त्याने युध्दत देवांना जिंकून त्रैलोक्य आपल्या अधिन केले. प्रल्हाद नावाचा त्याचा पुत्र विष्णु भक्त होता. प्रल्हादाच्या विष्णु भक्तीने वेडापिसा झालेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी हर प्रयत्न केले; परंतु हरीतत्पर प्रल्हादाने विष्णुंचे नाव घेणे काही सोडले नाही. ते पाहून तो राक्षसश्रेष्ठ म्हणाला, ''तुझा विष्णु कोठे आहे? ते तरी मला दाखव.'' प्रल्हादाने विष्णुंचे स्मरण करताच सनातन विष्णु उग्र अशा नृसिंह रुपाने खांबातून प्रगट झाले. हिरण्यकश्यपू व नृसिंह या दोघांमध्ये अत्यंत रोमहर्षक व तुंबळ युध्द झाले. दीर्घकाळाच्या युध्दनंतर विष्णुंनी हिरण्यकश्यपूचे उदर विदारून त्याला ठार करून प्रल्हादाला गादीवर बसविले.

त्यामुळे राक्षसगण भक्त प्रल्हादाला पितृहत्यारा म्हणू लागले. या लोकोपवादाच्या शांतीसाठी नारदमुनींच्या आज्ञेप्रमाणे भक्त प्रल्हाद गोकर्ण क्षेत्री आला. तेथे त्याने नृसिंहाची स्थापना करून पद्मासनबध्द होऊन 12 वर्षे निराहार राहून तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने भगवान नृसिंह प्रसन्न होऊन भक्त प्रल्हादाची पितृद्रोहाच्या निंदेतून सुटका केली. वैशाख शुक्ल पौर्णिमेला कोटीतीर्थात स्नान करून या नृसिंहाची पूजा केली असता, पितृ-मातृ वधादी पापांपासून मुक्ती मिळते.

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका