ब्रह्माश्रम, केतक्याश्रम (अध्याय ७३)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

ब्रह्माश्रम, केतक्याश्रम (अध्याय ७३)

पूर्वी एकदा श्रेष्ठत्वावरून ब्रह्मा आणि विष्णु यांच्या मध्ये मोठा वाद निर्माण होऊन, आपापसात भांडण सुरु झाले. एवढयात त्या दोघांमध्ये सहस्त्र सूर्यांप्रमाणे तेजस्वी असलेले लिंग अवतरले. नंतर शंभूमहादेवही तिथे प्रगट झाले आणि त्या दोघांना म्हणाले, या लिंगाचे मस्तक अथवा पाया जो कोणी प्रथम पाहील तो दोघातला श्रेष्ठ जाणावा. शिवाने असे म्हणताच ब्रह्मदेवाने हंसाचे रुप घेऊन लिंगाचे मस्तक शोधण्यास तर विष्णुंनी वराह रुप घेऊन लिंगाचा पाया शोधण्यास सुरुवात केली. आकाशात उडत असताना हंसरुपी ब्रह्मांना लिंगाच्या मस्तकातून गळलेला सुगंधीत केतकी (केवडा) दिसली. ब्रह्मदेव म्हणाले, ''हे केतकी, ईश्वरासमोर मी लिंगाचे शीर बघितले आहे अशी खोटी साक्ष तू दे आणि त्याबदल्यात तूला जे काही हवे ते मी देईन.'' केतकीने होकार देताच, दोघेही शंकारांसमोर आले. तोपर्यंत वराह रुप धारण केलेले विष्णुही परत आले. विष्णु म्हणाले, ''मी लिंगाचा आदी अथवा अंत पाहू शकलो नाही.'' याउलट ब्रह्मदेव म्हणाले, ''मी लिंगाचे मस्तक बघून आलेलो आहे आणि त्याला ही केतकी साक्ष आहे.'' त्यांच्या या खोटारडेपणामुळे शंकराने ब्रह्मदेवांना अपूज्यत्वाचा तर केतकीला आपल्या पूजेला वर्ज्य होशील असा शाप दिला. अत्यंत संतापलेल्या शंकराच्या क्रोधातून काळभैरव प्रगट झाला आणि त्याने शंकराच्या आज्ञेप्रमाणे खडगाने ब्रह्मदेवाचे उर्ध्वशीर कापले.

या शापातून मुक्ती मिळण्यासाठी ब्रह्मदेव गोकर्ण क्षेत्री आले आणि शतशृङग पर्वताच्या माथ्यावर पवित्र आश्रम, सर्वपापनाशक तीर्थ आणि शंकराचे लिंग स्थापन करून तपश्चर्येला सुरुवात केली. त्यांच्या दिर्घ तपश्चर्येनंतर महादेव प्रसन्न होऊन म्हणाले, ''हे सुरश्रेष्ठा, तू स्थापन केलेले हे लिंग ब्रह्मेश्वर नावाने त्रैलोक्यात प्रसिध्द होईल. तुझ्या ह्या तीर्थात स्नान करून तुझ्या लिंगाची पूजा करून गायत्री मंत्र जपणाऱ्यास अनंत पुण्यप्राप्ती होईल.'' तेच हे गोकर्णक्षेत्रीचे स्वर्ग व मोक्षाचे फल देणारे, पापांचा नाश करणारे ब्रह्मेश्वर लिंग आणि ब्रह्माश्रम.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका