कामेश्वर तीर्थ (अध्याय ७१, ७२)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

कामेश्वर तीथ& (अध्याय ७१, ७२)

दाक्षायणी म्हणजेच दक्ष प्रजापतीची मुलगी सती, शंकराची पत्नी होती. पित्याने केलेल्या अपमानाने क्रोधीत होऊन तिने आपल्या देहाचा त्याग केला. कालांतराने तिने हिमालय व मेना यांच्या पोटी जन्म घेतला. पत्नीच्या विरहाने त्रस्त झालेले महादेव कैलास सोडून हिमालयाजवळ उग्र तपाचे आचरण करत होते. हिमकन्या गौरीने तारुण्यात प्रवेश करताच नारद मुनी हिमालयाकडे गेले आणि त्याला पूर्व इतिहास सांगून, ''तुझ्या ह्या मुलीचा पती भगवान शंकर होणार आहे'' असे सांगितले.

नारदांच्या बोलण्याने आनंदीत झालेला हिमालय आपली पत्नी, पुत्र आणि पौत्रीसह शंकराकडे गेले आणि म्हणाले, ''हे महादेवा, चालणे अशक्य असल्याने तुझ्या सेवेसाठी येण्यास मला विलंब झालेला आहे. कृपया मला क्षमा कर आणि माझी ही सर्वांग सुंदरी गौरी मी तुझ्या सेवेसाठी ठेवतो.'' पित्याच्या आज्ञेप्रमाणे गौरी सतत महादेवाच्या सेवेत रममाण होती.  एकदा इंद्राने मदनाला ज्या ठिकाणी पार्वती शंकरांची सेवा करीत होती त्या ठिकाणी पाठविले. मदनाने धनुष्यावर बाण चढवून ताकदीने चाप ओढला. या मदनबाणामुळे महादेव विकारभूत झाले. मदनाला बघून या दुरात्म्याचेच हे काम असावे असा विचार करून शंकराने आपल्या कपाळी असलेल्या तिसऱ्या नेत्राचा कटाक्ष कामदेवावर टाकला आणि स्वतःच्या चुकीमुळे मदन देव शिवाच्या क्रोधाग्नीत दग्ध झाला.

या पापाच्या शांतीसाठी तो तीन वेळा भूमीवर आला; परंतु काही केल्या गोकर्ण क्षेत्रात प्रवेश करण्यास लायक ठरला नाही. शेवटी त्याने गोकर्ण क्षेत्राच्या बाहेर राहून विधीवत लिंग स्थापन करून दिव्य सहस्त्र वर्षे तपस्वी व्रत आचरले. शिवध्यानपरायण झालेल्या त्या मदनाला ईश्वर प्रसन्न झाले आणि त्याची इच्छा विचारली.  मदन म्हणाला, ''माझ्या दोषांपासून मला शांती, गोकर्ण क्षेत्रात प्रवेश आणि पूजा करण्याची अवस्था मिळावी.'' ईश्वर म्हणाले, ''हे मकरध्वज मदना, वसुदेवाच्या घरी साक्षात कमलापती विष्णु जेव्हा अवतार घेईल तेव्हा तू त्याचा प्रद्दुम्न नावाचा पुत्र होशील.'' असे बोलून शंभू महादेवाने त्रिशुळाने भूमी खणून गंगेला पाताळातून वर आणले आणि पापविनाशी मंत्र मदनाला सांगून या मंत्राच्या उच्चारणाने गंगेमध्ये स्नान करण्यास सांगितले. अध म्हणजे पाप. कामदेवाचे पाप नष्ट करणारी, ब्रह्महत्या, गुरुपत्नीद्रोह, सुर्वणचोर, सुरापान इत्यादी अनेक पापांनी युक्त असलेल्या पापी माणसांना पापरहित करणारे हेच ते गोकर्ण क्षेत्राच्या बाहेर असलेले कामेश लिंग आणि हीच ती गोकर्ण क्षेत्राची मर्यादा ठरविणारी कामेश्वर अधनाशिनी नदी.


पापमुक्त झालेला मदन ईश्वरांबरोबर गोकर्ण क्षेत्री आला आणि तेथील सर्व शिवात्मक गोष्टी बघून कृतकृत्य झाला. कोटीतीर्थाच्या जवळ हरिहरेश्वराच्या पश्चिम दिशेस आश्रम बनवून लिंगाची स्थापना करून निराहार, जितेंद्रीय राहून कामदेवाने परत एकदा शिवाची आराधना सुरू केली. दिव्य सहस्त्र वर्षांच्या तपश्चर्येनंतर शिव, गौरी समवेत प्रगट झाले आणि म्हणाले, चैत्र शुक्ल त्रयोदशीला तू निर्माण केलेल्या कामतीर्थात स्नान करून जे लोक या तुझ्या कामेश्वर लिंगाची पूजा करतील त्यांच्या सर्व कामना, इच्छा पूर्ण होतील.  तेच हे कोटीतीर्थाजवळील कामेश्वर लिंग आणि कामदेव आश्रम.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका