महाबळेश्वर प्रतिष्ठापना (पाणलिंगोत्पत्ती) (अध्याय ५६)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

महाबळेश्वर प्रतिष्ठापना (पाणलिंगोत्पत्ती) (अध्याय ५६)

 

ब्रह्मदेवाने निर्मिलेल्या सृष्टीतील सर्व चराचर प्राण्यांचे सत्व काढून ईश्वराने रुद्रभूमीवर चार पायाचे, तीन डोळयांचे, तीन शिंगाचे, सुवर्णकांती असलेले एक अद्भूत असे मृग बनवून कैलासाला प्रयाण केले.

त्यामुळे निःसत्व झालेल्या देवादिकांनी ईश्वराची याचना केली. करूणावतार शिवाने ते दिव्य मृग आपआपली सत्वे काढून घेण्यासाठी देवादिकांच्या स्वाधीन केले. या मृगाच्या तीन शिंगाखाली तीन प्राणलिंगे होती.  ती ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी आपआपल्या पूजेसाठी काढून घेतली.

लंकाधिपती रावणाची आई कैकसी शिवभक्त होती. एकदा इंद्राने मत्सराने प्रेरीत होऊन ती पूजीत असलेले शिवलिंग समुद्रात बुडविले. व्रतभंग टाळण्यासाठी रावणाच्या आईने वाळूच्या लिंगाची पूजा करून नेम सुरु ठेवला.

या गोष्टीचा राग येऊन राक्षसाधिपती रावणाने सामगानाने, विविध प्रकारच्या नृत्याने तसेच यमनियमांच्या साह्याने घोर तपश्चर्या करून भक्तवत्सल गिरीषाला प्रसन्न करून ईश्वराचे प्राण असलेले मृगशृङग रुप लिंगाची याचना केली. भोलेनाथांनी पेटीतील लिंग बाहेर काढून त्या लिंगाची विधीवत पूजा करून शांतीमंत्राने, सद्योजातादी मंत्राने आवाहन करून रावणाला सांगितले, हे राक्षसश्रेष्ठा हे लिंग घेऊन आपल्या नगराला पायी जा आणि कोणत्याही परिस्थितीत हे लिंग जमिनीवर ठेऊ नकोस कारण जेथे तू हे लिंग ठेवशील तेथेच ते सदैव राहील.

दशाननाने शिवाकडून लिंग प्राप्त करून मोठया आनंदाने कैलासाहून जवळच्या रस्त्याने लंकेला प्रयाण केले. ही वार्ता कळताच देवगणांमध्ये हाहाकार माजला. ब्रह्मा, विष्णु समवेत सर्व देव रावणाच्या पाठोपाठ गेले त्यांना पाहून रावणाने मेघाप्रमाणे गर्जना केली आणि त्या सर्वांना तुच्छ लेखून गोकर्णाच्या दिशेने प्रयाण केले. संध्यासमयी रावण शत्रूंवर हल्ला करीत नाही ही गोष्ट माहिती असल्याने विष्णुंनी आपल्या सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून टाकले आणि गजाननाला बोलावून म्हणाले, हे महाबाहो विघ्नेश्वरा बटू रुप धारण करून तू रावणाकडे जा. थोडयाच वेळात राक्षकश्रेष्ठ रावण सायं संध्या वगैरे नित्यकर्म करण्यासाठी पितृस्थालीकडे येईल. लिंग हातात धरून संध्या शक्य नसल्याने तो ते मृगशृङ्ग लिंग तुझ्या हातात देईल. ते लिंग हातात घेऊन तू त्याला सांग की, हे रावणा  माझ्या शक्तीनुसार मी हे लिंग हातात धरीन आणि जड झाल्यास मी तुला तीन वेळा हाक मारीन, या तीन हाकात तू न आल्यास, मी हे लिंग खाली ठेवीन.

विष्णुनी सांगितल्याप्रमाणेच झाले आणि दशाननाने ते मृगशृङ्ग लिंग बटू रुपातील गणपतीच्या हातात दिले. देवादिकांनी त्रैलोक्याचा भार त्या लिंगाच्या मस्तकावर ठेवला. त्यामुळे हा भार असह्य झाल्याने बटू गणेशाने रावणाला तीन वेळा हाक मारली. गायत्री मंत्राचा जप करून ध्यानधारणेत मग्न असलेला रावण तीन हाकात न आल्याने स्वयं विघ्नकर्त्या गजाननाने ब्रह्मा, विष्णुंच्या साक्षीने त्रैतायुगात वैवस्वत मन्वंतरात, ईश्वर अब्दात, शरद ॠतूत, शुक्ल प्रतिपदेला, व्यतिपात योगात, रविवारी, 23 तारखेला, मीन लग्नात, विशाखा नक्षत्रात, श्रलेष्मातक वनात, आदि गोकर्णाजवळ स्थापन केलेले ईश्वराने पुजलेले हेच ते अतिपवित्र मृगशृङ्ग लिंग.

 

भूमीवर ठेवताच हे लिंग सप्तपाताळ भेदून स्थिर झाले. सुदर्शन चक्र काढून घेतल्याने सूर्याच्या प्रकाशात रावणाला भूमीवरील ते लिंग दिसले. शक्तीशाली रावणाने ते लिंग खेचून काढण्याचा प्रयत्न केला;परंतु ते लिंग मुरडून त्याचा आकार गायीच्या कानासारखा झाला. त्याच्यावर थोडेसे ओरखडे उठले आणि त्याचे काही बारीक तुकडे निघाले, जे रावणाने दूर फेकले.

द्विभुज बटू गणेश

क्रोधाने वेडापिसा झालेल्या रावणाने त्या बटूरुपी गणेशाला एक जोरदार ठोसा लगावला आणि आता आश्चर्यचकित होण्याची वेळ रावणाची होती. प्रचंड बलवान दैत्यराज रावणाच्या मारामुळे त्या बटूच्या डोक्यावर फक्त एक खोक पडली. त्यावेळी गजाननांनी आपले खरे स्वरुप प्रगट केले. तोच हा बटूरूपातील प्राणलिंगापासून 40 पावले मागे आग्नेय दिशेला पश्चिमाभिमुख असलेला गोकर्ण क्षेत्रीचा त्रिभुवनातील एकमेव द्विभुज बटू गणेश.


गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका