विश्वामित्र आश्रम (अध्याय ३८)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

विश्वामित्र आश्रम (अध्याय ३८)

ब्रह्मदेवाच्या एका मानसपुत्राचे नाव होते कुशीक, त्याच्या मुलाचे नाव होते कुशनामी आणि कुशनामीच्या मुलाचे नाव होते गाधी. अपत्यप्राप्ती साठी तपश्चर्या करीत असताना दैव योगाने गाधीना मुनीश्रेष्ठ दुर्वास मुनींच्या आशीर्वादाने त्रैलोक्याला प्रभावित करणारा विश्वामित्र नावाचा पुत्र प्राप्त झाला. कालांतराने विश्वामित्र चक्रवर्ती राजा झाले.

एकदा शिकारीमुळे भुकेलेला, तहानलेला विश्वामित्र शतशृङग पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वसिष्ठ ॠषींच्या आश्रमात गेला. थकलेल्या या राजाला वसिष्ठांनी भोजनासाठी ससैन्य आमंत्रण दिले. विश्वामित्र म्हणाले, हे ब्राह्मणा माझे सैन्य, हत्ती, घोडे यांनी युक्त असून फार मोठे आहे. त्यामुळे एवढया सर्वांचे भोजन करणे तुम्हाला अशक्य आहे असे मला वाटते. वसिष्ठ म्हणाले, राजा आज माझा भाग्याचा दिवस आहे आणि मी तुम्हा सर्वांना षडरसाने युक्त असे रुचकर भोजन देतो.

असे बोलून वसिष्ठ कामधेनूकडे गेले आणि तिला भोजनाची विनंती केली. क्षणार्धात आश्रमामध्ये विविध प्रकारची तोरणे लागली. राजवाडयाप्रमाणे विविध प्रकारचे सुर्वण कक्ष तयार झाले. हत्ती घोडे यांच्यासाठी शाला तयार झाल्या, सभामंडप तयार झाला, विविध प्रकारची रत्नजडीत भांडी तयार झाली आणि विश्वामित्रांनी आपल्या सैन्यासमवेत भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला. या स्वर्गीय सुखाची चटक लागलेल्या विश्वामित्रांनी वसिष्ठ मुनींकडे कामधेनूची याचना केली. कामधेनूच्या बदल्यात विश्वामित्रानी आपले संपूर्ण राज्य वसिष्ठांना देण्याची तयारी दाखविली; परंतु वसिष्ठांनी या गोष्टीस नकार दिला. क्रोधाने विवेक नष्ट झालेल्या विश्वामित्राने कामधेनूला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला. पण झाले काय? विश्वामित्रांना कामधेनू तर मिळालीच नाही; परंतु निःसैन्य होण्याची वेळ आली. विश्वामित्रांच्या लक्षात आले की, क्षत्रिय तेजापेक्षा ब्राह्मतेज बलवान आहे आणि त्यामुळे राज्याचा त्याग करून विश्वामित्र शतशृङग पर्वताच्या शिखरावर निराहार राहून वसिष्ठांना ठार मारण्याच्या आयुधाची प्राप्ती करण्यासाठी भगवान शंकराची तपश्चर्या करू लागले. शंकरांना प्रसन्न केल्यानंतर विश्वामित्राने तपश्चर्येने ब्रह्मदेव व विष्णुनांही प्रसन्न करून घेतले. ज्या ठिकाणी हे सर्व देव प्रकट झाले तेच हे गोकर्णक्षेत्रीचे विश्वामित्र स्थापित ईश्वर लिंग, विश्वामित्र आश्रम आणि विश्वामित्र तीर्थ.

 

मकर संक्रातीला येथे स्नान करून या लिंगाची पूजा करून एक लक्ष सावित्रीचा जप करणारा सर्व लोकांत सन्मानित होतो आणि सात जन्म वेदवेदांगात पारंगत होतो. आश्चर्याचा भाग म्हणजे आजही विश्वामित्रांच्या तेजाने पापीलोक तेथे जात नाहीत.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका