शतशृङग पर्वत (अध्याय ३२)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

शतशृङग पर्वत (अध्याय ३२)

ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या वास्तव्यामुळे प्रसिध्द झालेले तीन पर्वत म्हणजे ब्रह्मदेवाचा शतशृङग, विष्णुंचा इंद्रनील, महेशाचा कैलास. विविध प्रकारच्या पुष्प आणि फळ वृक्षांनी युक्त असलेल्या शतशृङग पर्वताच्या शिखरावर पक्षांचा राजा विष्णुंचे वाहन गरुड हा सुमुख आणि दुर्मुख या बलवान नागराजांना खाण्यासाठी बसला होता. सहज त्याची दृष्टी शतशृङग पर्वताच्या सृष्टीसौंदर्याकडे गेली आणि तोंडातून दुर्मुख नाग खाली पडला. गरुड त्याचा पाठलाग करू लागला, भयपिडीत अशा दुर्मुखाने शतशृङग पर्वताच्या वनराईचा आश्रय घेतला. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने रागाने लालबुंद झालेल्या त्या गरुडाने तो शतशृङग पर्वतच उखडून नागासकट आकाशात उड्डाण केले.

या शतशृङग पर्वतावर ब्रह्मदेव समाधिष्ट होते. गरुडाचे ते अकृत्य बघून क्रोधीत झालेल्या ब्रह्मदेवाने त्रैलोक्याचा भार गरुडावर टाकला. हा भार असह्य झाल्याने गरुड समुद्रात बुडण्याची वेळ आली. अत्यंत विव्हळ होऊन तो रडू लागला आणि नेमके त्याच क्षणी त्याला गोकर्ण क्षेत्री तपश्चर्या करीत असलेले ब्रह्मदेवांचे मानसपुत्र अगस्ती ॠषी दिसले. गरुडाने त्यांना आपल्या प्राण रक्षणाची विनंती केली. अंतर्यामी अगस्ती ॠषींनी ही ईश्वराचीच इच्छा आहे असे जाणून क्षणार्धात त्रैलोक्याचा भार असलेला शतशृङग पर्वत ब्रह्मदेवासह गरुडाच्या पाठीवरून उचलून रुद्रयोनीच्या दक्षिणेला समुद्रात ठेवला.

तपोनिधी, समुद्र प्राशन करून जिरवून टाकणाऱ्या अगस्ती ॠषींनी स्थापन केलेले, त्रिभुवनात प्रसिध्द असलेले, ज्याच्या तपश्चर्येने अगस्ती मुनींनी योगैश्वर्य प्राप्त केले तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे वरदेश्वर लिंग आणि जवळ जवळ कचराकुंडात रुपांतर झालेले हे अगस्तीतीर्थ.

शृङग म्हणजे शिखरे आणि शंभर शिखरे असलेला हा गोकर्ण क्षेत्री स्थित झालेला, ब्रह्मदेवाच्या वास्तव्याने पावन झालेला हाच तो शतशृङग पर्वत. देवर्षीगणांनी पूजलेल्या शतशृङगाचे दोन भाग समुद्रात पडले आणि 98 शकले गायीच्या शिंगाप्रमाणे अस्ताव्यस्त पडली. ब्रह्मदेवाच्या निवासामुळे याला ब्रह्मलोक असेही म्हणतात आणि हा पर्वत स्वर्गाचे द्वार आहे असे विद्वान मानतात.


या शतशृङग पर्वतावर दोन कोटी तीर्थे होती. त्यातील अर्धी समुद्रात बुडाली तर उरलेल्या अर्ध्या तीर्थांपासून तयार झालेले, ज्या तीर्थात स्नान केल्याने सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते, पुण्यवान लोकांमध्ये श्रेष्ठत्व प्राप्त होते, ज्या तीर्थाशी यज्ञयाग केल्याने दहा अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळून अंती स्वर्गप्राप्ती करून देते ते हेच गोकर्णक्षेत्रीचे कोटितीर्थ आणि कोटेश्वर लिंग.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका