नागतीर्थ (अध्याय ३१)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

नागतीर्थ (अध्याय ३१)

कद्रू आणि विनता या दक्षाच्या दोन कन्या कश्यप ॠषींच्या पत्नी होत्या. कद्रूने शेष, अनंत, वासुकी, तक्षक इत्यादी एक हजार उत्तम बलशाली नागांना जन्म दिला. तर विनतेने गरुड आणि अरुण या दोन पक्षीरुपी पुत्रांना जन्म दिला. या दोन बहिणांमध्ये सवती मत्सराने तीव्र वैर निर्माण झाले. एकदा या दोघी बहिणी मेरु पर्वतावर फिरत असताना त्यांनी उच्चैश्रव नावाचा अश्व फिरताना पाहिला. त्याला बघून कद्रू विनतेला म्हणाली, ''अमृत मंथनातून उत्पन्न झालेला हा काळया शेपटीचा शुभ्र अश्व शोभून दिसत आहे.'' त्यावर विनता म्हणाली, ''हे कल्याणी, हा अश्व पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सर्व बाजून शुभ्र आहे.'' शेपटीच्या रंगावरून दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि शेवटी दुसऱ्या दिवशी परत शेपटी नीट बघण्याचे ठरले. रागाच्या भरात दोघींमध्ये अशी अट ठरली की, जर शेपटी पांढरी निघाली तर कद्रू विनताची दासी होईल आणि शेपटी काळी निघाली तर विनतेने कद्रूचे दास्यत्व स्विकारायचे.

कपटी मनाच्या कद्रूने विनतेवर विजय मिळविण्याच्या इच्छेने, आपल्या विषयुक्त नागपुत्रांना बोलावून म्हटले, ''हे पुत्रांनो माझ्या आज्ञेनुसार उद्या सकाळी तुम्ही सर्व जण काळे होऊन अश्वाच्या केसांच्या अग्रावर रहा.'' दहा प्रमुख नागांनी आम्ही असा खोटेपणा करणार नाही असे निक्षून आईला सांगितले आणि त्यामुळे क्रोधीष्ट झालेल्या कद्रूने या दहा पुत्रांना आपल्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे शाप दिला, ''जनमेजयाकडे सर्पसत्र होऊन त्या यज्ञाच्या अग्नीत तुम्ही सर्वजण नाश पावाल.''

या शापातून उःशाप मिळण्यासाठी हे प्रमुख दहा नाग गोकर्ण क्षेत्री आले. तेथे त्यांनी आश्रम बांधून विमलजलयुक्त तीर्थकुंड तयार करून लिंग स्थापून दहा सहस्त्र वर्षे निराहार तपश्चर्या केली. त्यांच्या या तपश्चर्येने ब्रह्मदेव, रुद्र आणि विष्णु सकट प्रगट झाले आणि त्यांच्या आशीर्वादाने हे दहा नाग सिध्द झाले.
सरस्वती तीर्थाच्या किंचित पूर्वेला एक बाणाच्या अंतरावर प्रसिध्द असलेले हे गोकर्ण क्षेत्रीचे सर्वसिध्दीकारक नागतीर्थ आणि नागेश्वर.


गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका