सागरेश्वर (अध्याय १५ आणि १६)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

सागरेश्वर (अध्याय १५ आणि १६)

सृष्टीच्या उत्पत्तीच्या सुरुवातीच्या काळात समुद्रामध्ये राक्षसांचे वास्तव्य होते. हे राक्षस रात्री बाहेर पडत आणि ॠषीमुनी, मनुष्यप्राणी भक्षण करून दिवसभर समुद्रात लपत. या निशाचरांमुळे पृथ्वीवर जिकडे तिकडे हाडांचेच साम्राज्य पसरले. समुद्राच्या आसऱ्यामुळे या राक्षसांचा विनाश करणे अशक्य होते. या नेहमीच्या उपद्रवातून सुटका मिळण्यासाठी ॠषीमुनींनी ब्रह्मदेवांची आराधना केली.

ब्रह्मदेव म्हणाले, समुद्रात जाऊन या राक्षसांचा विनाश करणे अशक्य आहे आणि समुद्राला निर्जल करणे फक्त अगस्तींना शक्य आहे. मग ॠषीमुनी, देवगण गोकर्ण क्षेत्री तपश्चर्येत मग्न असलेल्या महातेजस्वी अगस्ती ॠषींकडे गेले. या सर्वांच्या इच्छेला मान देऊन अगस्ती ॠषींनी समुद्र प्राशन करून निर्जल केला. समुद्र निर्जल होताच देवांनी शस्त्राअस्त्रांसकट राक्षसांवर हल्ला करून एेंशी हजार दैत्यांचा विनाश केला. उरलेले दैत्य घाबरून आपल्या स्त्रीया-मुलांसकट पाताळात पळून गेले आणि देवांचा विजय झाला. यानंतर सर्वांनी अगस्ती ॠषींना समुद्र परत देण्याची विनंती केली;परंतु अगस्ती ॠषींनी समुद्राचे पाणी पचवून टाकल्याने परत देण्यास असमर्थता दाखवली.

यामुळे निर्जल झालेल्या समुद्राने आपल्या पुर्नजीवनासाठी गोकर्ण क्षेत्री येऊन हजारो वर्षे तप केले. त्याच्या या तपश्चर्येने भगवान शंभू प्रसन्न झाले आणि त्यांनी समुद्राला सांगितले, ''सूर्यकुळात सगर नावाचा राजा जन्माला येऊन अश्वमेध यज्ञ करेल. या अश्वाचे रक्षण करण्यासाठी तो त्याच्या साठ हजार पुत्रांची नियुक्ती करेल. इंद्रदेव या अश्वाचे हरण करून पाताळात कपिलमुनींच्या आश्रमात लपवेल. भूलोक, स्वर्गलोक शोधून अश्व न मिळाल्याने हे साठ हजार सगर पुत्र पृथ्वी खणून पाताळात शिरतील. कपिलमुनींना चोर समजून ते त्यांना ठार मारण्यास उद्युक्त होतील;परंतु कपिलमुनींच्या तपोबळाने त्या सर्वांचा विनाश होईल. सगराचा नातू भगीरथ आपल्या पूर्वजांच्या उध्दरासाठी तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवर आणेल. ज्या क्षणी भगीरथ या स्वर्ग नदीच्या पवित्र जलाने पितर संस्कार करेल त्याच वेळेस ती गंगा, वरुणाचे निवासस्थान असलेल्या, हे समुद्रा, तुला भरून टाकेल. सगर पुत्रामुळे पूर्णत्वास आलेल्या तुला सागर नाव पडेल.

हेच ते महाबळेश्वर मंदिराच्या पूर्वेस एका कठडयावर बंद असलेले मनुष्यमात्रांच्या इच्छा पूर्ण करणारे गोकर्ण क्षेत्रीचे सागरेश्वर लिंग आणि सागर तीर्थ.

 

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका