अध्याय १८ - गंगानयनं समुद्रपूरणम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय १८ - गंगानयनं समुद्रपूरणम्‌

सगरपुत्रांच्या उध्दारासाठी गंगेचे पृथ्वीवर अवतरणे आवश्यक होते. पृथ्वीवर आल्यावर तिला पाताळात नेऊन कपिलमुनींच्या आश्रमापर्यंत नेणे अत्यंत गरजेचे होते. गंगेला पाताळापर्यंत नेऊन आपल्या पूर्वजांचा उध्दार करण्याचे कार्य दिलीपपुत्र भगीरथाने केले याचे वर्णन या अध्यायात आले आहे.

सगराच्या कुळातील राजा दिलीपानंतर भगीरथ पृथ्वीचा सांभाळ करू लागला. राज्य सांभाळत असूनही तो संयमी राजा अतिशय उद्विग्न झाला होता. हे राजा, कपिलमुनींच्या क्रोधाग्नीमध्ये भस्मभूत झालेल्या आपल्या पूर्वजांच्या नाशाची गोष्ट ऐकून तसेच त्यांना स्वर्गप्राप्ती होणार नाही हे जाणून त्याला फार दुःख होत होते. अनेक प्रकारची सुखे भोगून झाल्यावर, राज्याची जबाबदारी अमात्यांवर सोपवून तो इक्ष्वाकुपुत्र (भगीरथ) तपश्चर्येसाठी संकल्प करून हिमालयात गेला. तेथे जाऊन तो राजा निराहारपूर्वक तप आचरू लागला. हजार वर्षे त्याने ब्रह्मदेवाची आराधना केली. तेव्हा जगताचा निर्माता (ब्रह्मा) संतुष्ट होऊन, "वर माग", असे म्हणाला. त्यावर भगीरथाने वर मागितला, "हे देवेशा, गंगेला पाताळापर्यंत आणून माझ्या पितरांना तिच्या जलाने तर्पण करून, तिला सागरापर्यंत पोचवून नंतर दहा हजार वर्षे राज्य केल्यावरच मी मरेन आणि त्याप्रमाणे तू करावेस." "तसेच होईल," असे त्याला आश्वासन देऊन व तसेच त्याला आयुष्य देऊन पितामह ब्रह्मा तेथेच अंतर्धान पावले. नंतर भगीरथाने सहस्रवर्षे गंगेची आराधना केली. पंचाग्नींमध्ये (ही एक प्रकारची साधना आहे) राहून तसेच केवळ वायु व पाणी यांचे भोजन करत राहिला. तेव्हा हेमवती गंगा त्याच्या पुढे प्रकट झाली व भगीरथाला म्हणाली, "हे राजा, तुझी इच्छा काय आहे ते सांग, मी ती पूर्ण करीन."

"हे महाभागे, पृथ्वीवर तुझे अवतरण व्हावे अशी माझी इच्छा आहे" असा वर भगीरथाने मागितला. "तसेच होईल," असे म्हणत ती पुन्हा म्हणाली, "हे राजन्‌, माझा वेग फार मोठा आहे. रुद्राशिवाय कोणी अन्य तो धारण करू शकणार नाही. जेव्हा रुद्र प्रसन्न होऊन मला धारण करेल तेव्हा माझे स्मरण कर" असे म्हणून ती सती अंतर्धान पावली. नंतर राजा भगीरथ कैलास पर्वतावर जाऊन पुन्हा शिवाची पूजा करू लागला. सहस्रवर्षे भगीरथाने तप केल्यावर जगन्नाथ प्रसन्न्‌ होऊन त्याच्या पुढयात प्रकट झाले व म्हणाले, "हे महान्‌ राजा, वर माग, मी तुझे इप्सित पूर्ण करीन." तेव्हा त्या सांब त्रिभुवनेश्वराला शिरसाष्टांग नमस्कार करून राजा भगीरथ हात जोडून म्हणाला, "हे महादेवा, कपिलमुनींच्या क्रोधाग्नीने दग्ध झालेल्या माझ्या पूर्वजांना मुक्ती व सद्‌गती प्राप्त होण्यासाठी स्वर्गंगेचे जल आवश्यक आहे, त्यासाठी गंगा पृथ्वीवर अवतरणार आहे. आपण तिला धारण करणे हे शंकरा, तुझ्याविना अन्य कोणाला शक्य नाही." "तथास्तु," असे म्हणून महेश्वर पर्वतासमान अशा दुसर्‍या मेरुगिरीवर जाऊन राहिला. शूलपाणि शंकराला तेथे राहतांना पाहून राजाने गंगेचे स्मरण केले. त्याचे चिंतन पाहून तसेच पर्वतावर शंकरांचे वास्तव्य पाहून ती गंगा स्वर्गातून शंभूच्या मस्तकावर कोसळली. देवगंधर्वांनी जिचे सेवन केले आहे व जिचे जल पुण्यकारक आहे अशी ती महावेगा, केवळ स्मरणाने पापांचा नाश करणारी एखाद्या माळेप्रमाणे शंकराच्या भालप्रदेशी पोचून त्यांच्या जटाभारावर फिरू लागली. तिचे हे रुप पाहून इंद्रादि सर्व आश्चर्यचकीत होऊन पाहू लागले. (या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट आहे जिचा उल्लेख या अध्यायात नाही. शंकराच्या मस्तकावर कोसळण्याने त्यांचे मस्तक बुडून जाणार व हे आपल्यामुळे होणार या गोष्टीने गंगेला अहंकार झाला त्यामुळे ती सुखावली. परंतु आपल्या मायेने ते जाणून शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये सामावून टाकले. जटाभारातून बाहेर येण्याचा मार्ग न सापडल्यामुळे गंगा तेथेच अडकून पडली. त्यामुळे भगिरथाचे काम अडले.) भगीरथाने पुनः भगवान्‌ शंकरांची आराधना केली. त्यांच्या कृपाप्रसादाने गंगा तेथून मुक्त होऊन मेरुपृष्ठावर कोसळली. नंतर स्वतःला चार प्रवाहात विभागून ती गंगा पूर्वेला गेली (जी आज गंगासागर म्हणून तिचे स्थान प्रसिध्द आहे.) पश्चिमेला केतुमालमध्ये, दक्षिणेला भारतात व उत्तरेला उत्तरकुरूकडे. नंतर मेरुपर्वताच्या पृष्ठभागावर येऊन भगीरथाला ती म्हणाली, "हे राजेन्द्रा, ज्या कारणासाठी स्वर्गातून मला नेत आहेस तो मार्ग दाखव." तेव्हा ठीक आहे, असे म्हणून राजा दक्षिणेकडे निघाला. सीमाचल ओलांडून देवांपासून दूर झालेली ती महानदी राजासह हिमालयात पोचली. तेथून निघाल्यावर वाटेत जह्नु राजा यज्ञ करीत होता तेथे आली. राजा जह्नुला म्हणाला, "हे ब्रह्मर्षे, उठ, उठ, येथून दूर जा. हिमवती या मार्गाने येत आहे. अति वेगामुळे मार्गातील खडक, शिळा वगैरे आकर्षून घेत आहे. मोठमोठे वृक्षही तिच्यामध्ये सामावत आहेत. तेव्हा हे मुने, तू दूर हो."

तेव्हा वयाने, तपःश्चर्येने व संयमाने वृध्द असा तो जह्नु राजा भगीरथाला म्हणाला, "हे राजश्रेष्ठा, मी वृध्द आहे आणि दूर जाऊ शकत नाही. तेव्हा जे घडावयाचे आहे ते घडेल." असे म्हणून तो ब्रह्मर्षि हसू लागला. तेथून ती त्रिपथगा गंगा जात असता त्याने तिला अडवून आपल्या कमंडलूमध्ये बंदिस्त केले. क्षणात ती गंगा अदृश्य झाली. तिला प्राशन करून तो मुनिश्रेष्ठ भगीरथाला म्हणाला, "महाराज, तुझी महावेगप्रवाहिनी गंगा कोठे आहे?" आश्चर्यचकित डोळ्यांनी राजा भगीरथ त्या जह्नुच्या पायांशी, "क्षमा करा, क्षमा करा," असे पुनःपुन्हा म्हणत तेथेच राहिला. अशा प्रकारे काळ जात असता जह्नुने आपल्या मांडीतून तिला सोडले. (जह्नुने तिला निर्माण केले म्हणून ती जान्हवी) त्याच्याकडून निघालेली गंगा, भगीरथाबरोबर निघाली व कपिल मुनींच्या आश्रमाशी, जेथे भगीरथाचे पूर्वज दग्ध झाले होते, तेथे आली. तेथे भगीरथाने तिच्या जलाने त्यांचे तर्पण श्राध्द केले. (त्यांना मुक्त करून सद्‌गती प्राप्त झाली) आणि लगेच तिने क्षणात आपल्या पाण्याने समुद्र भरून टाकला. (येथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सगरपुत्र अश्वाला शोधण्यासाठी पाताळात गेले. पाताळात जातांना पृथ्वीला खणत खणत गेले. त्यामुळे खूप मोठा, विशाल असा खड्डा पडला. हा खड्डा गंगेने आपल्या पाण्याने भरून टाकला व त्याचा समुद्र झाला) समुद्र भरल्यावर तिचे जल लोप पावले. पुढे रामाने या पाण्याचा उध्दार केला. तसेच विष्णूचा अंश असलेल्या परशुरामानेही केला. ऋषी, मानवांच्या हितार्थ पूर्ववत्‌ तिला पुन्हा निर्माण केले. आपल्या पूर्वजांना सद्‌गती प्राप्त व्हावी तसेच त्यांचा उध्दार व्हावा यासाठी भगीरथाने गंगेला कन्येवत्‌ सांभाळले, अनेक प्रयत्नांनी खेचून आणले. त्या दिवसापासून, हे राजा, गंगेला भागीरथी हे नाव पडले.

पुढे भगीरथाने पृथ्वीवर दहा हजार वर्षे राज्य केले. या पवित्र, पापविनाशक, समुद्र भरून टाकणार्‍या नदीविषयी जो मनुष्य ऐकतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. संपत्तीचा उपभोग घेऊन तो शिवलोकात जातो.

अध्याय १ ते २०