अध्याय १७ - भगीरथोत्पत्तिकथनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय १७ - भगीरथोत्पत्तिकथनम्‌

१.- २. शतानीकाने म्हटले, ‘हे नृपश्रेष्ठ सगराला कशी दीक्षा मिळाली? त्याचे पुत्र कसे नष्ट झाले? तसेच ते कसे वर गेले? समुद्र कसा पूर्ण भरला? याविषयी हे सूता, तू सांग. सूताने म्हटले, ‘हे राजा, सगराची पवित्र कथा मी तुला सांगतो, ती ऐक.

३. सूर्यवंशात जन्मलेला सगर नावाच्या नृपश्रेष्ठाने जणू दुसरा सत्यधर्म असल्याप्रमाणे, संपूर्ण पृथ्वीवर शासन केले.

४. त्या श्रेष्ठ राजाने आपले गुरू वसिष्ठ यांच्या आज्ञेने ९९ यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडले.

५.-७. त्यानंतर शंभरावा यज्ञ पार पाडण्यासाठी दीक्षा घेतलेल्या सगर राजाने यज्ञमंडपात येऊन वसिष्ठ आदी ऋषींच्या समवेत पत्रक लिहून दिव्य असा अश्व सोडून दिला. त्याच्या रक्षणासाठी त्याने युध्दकर्मात निष्णात अशा आपल्या ६० हजार बलवान पुत्रांना नियुक्त केले की जे अश्वाचे रक्षण करण्यास उत्सुक होते.

८.-९. त्या अश्वाच्या मागोमाग जाणार्‍या त्यांनी सर्व लोकांध्ये भ्रमण केले. अशा प्रकारे ते सर्वजण त्या अश्वाचे रक्षण करताना, इंद्राने अदृश्यरूपाने त्या यज्ञात विघ्न निर्माण करण्यासाठी यज्ञासाठी कल्पिलेल्या त्या दिव्य अश्वाचे अपहरण केले.

१०. त्या अश्वाचे हरण करून इंद्राने त्याला पाताळात कपिल ऋषींच्या आश्रमात ठेवले आणि तो स्वतः त्या ठिकाणी अदृश्यरूपात लपून राहिला.

११.-१३. त्यानंतर त्या सगरपुत्रांनी त्या अश्वाला पृथ्वीवर शोधून मग स्वर्गातही शोधले. पण तेथेही तो अश्व न दिसल्यामुळे ते सह्य पर्वताच्या पायथ्याशी आहे. त्या सर्व महाबलवान सगरपुत्र नऊ भागात विभागलेल्या भरत वर्षाला तसेच आसपासच्या भूभागाला खणून अतिशय वेगाने पाताळात गेले.

१४. पाताळात सभोवती त्या अश्वाला शोधून ते महाबलशाली सगरपुत्र कपिलांच्या आश्रमात गेले.

१५. त्या ठिकाणी अश्वाला पाहून त्यांनी कपिलांना ताडन केले. ‘हा चोर आहे' असे म्हणणार्‍या त्यांनी त्यांना दोरीने घट्ट बांधून ठेवले.

१६. तेव्हा मुनिश्रेष्ठ अशा कपिलांनी डोळे उघडून सगरपुत्रांना बघितले आणि तत्क्षणी ते भस्मसात झाले.

१७.-१८. सर्व ६० हजार पुत्र कपिलामुळे नष्ट झाले. हे पुत्रा, अशा प्रकारे सगरपुत्र नष्ट झाले असता, त्याच वेळी श्रेष्ठ मुनी नारद त्वरेने भूलोकी जाऊन तो वृत्तांत कथन करण्यासाठी सगराच्या प्रासादात गेले.

१९. यज्ञदीक्षा घेतलेल्या त्या श्रेष्ठ राजाने देवर्षींना आलेले पाहून, उठून, त्यांना अभिवादन करून, नंतर आसन देऊ केले.

२०. आसनस्थ झालेल्या त्या तपोनिधींची पाद्यपूजा करून त्याने त्रिलोकातील सर्वांचे स्वास्थ्य व क्षेकुशल विचारले.

२१. हे कौरव, तेव्हा नारदांनी सगरांचे निधन व अश्व न मिळणे याविषयी त्याला सर्वकाही कथन केले.

२२.-२३. हे राजा, कपिल मुनींच्या तेजामुळे तुझे पुत्र भस्मसात झाले. अज्ञानी, पापी, लोकांना त्रास देणारे ते नष्ट झाले. पण तू चिंता करू नकोस. दुराचारी ते नष्ट झाले. कारण जे होणार असते ते टळत नाही.

२४. हे निष्पाप राजा, वर देणार्‍या रुद्राने म्हटले आहे, ‘उत्पत्ती व नाश हे त्यांच्या कर्मानुसार आहे.'

२५. त्यामुळे ते नष्ट झाले. त्यांच्या नाहीशा होण्यामुळे तू चिंता करू नकोस.' असे म्हणून हे राजा, भगवान नारद ऋषी अंतर्धान पावले.

२६. त्यावेळी मुनींनी कथन केलेली हकीकत ऐकून, तसेच रुद्राचे बोलणे आठवून, त्या राजाचे दुःख कमी झाले.

२७. नंतर त्या दुःखीकष्टी झालेल्या इक्ष्वाकुनंदन सगराने आपल्या अंशुमान नावाच्या नातवाला राजसभेमध्ये बोलावून त्याला गोंजारत म्हटले,

२८. ‘हे निष्पाप बालका, पूर्वी मी तुझ्या पित्याचा त्याग केला होता आणि माझे इतर अनेक पुत्र शूर व बलशाली होते.

२९. ते सर्व एकाचवेळी कपिल मुनींच्या क्रोधाग्रीत पतंगाप्रमाणे नष्ट झाले. तूच माझा वारस आहेस. कारण आता माझी अन्य संतती नाही.

३०. तेव्हा आता, हे सुव्रत पुत्रा, कपिलांकडे जाऊन, त्यांना विनंती करून ताबडतोब अश्व घेऊन ये.

३१. हे निष्पाप बालका, हा श्रेष्ठ यज्ञ पूर्ण करून मी तुला राज्य देईन. मी आता तप करू इच्छितो. तेव्हा तात्काळ हे कार्य पूर्ण कर.

३२. जे शतानीकाने पूर्वी सांगितले होते, तेच आता स्कंद सांगत आहे- सगर राजाने स्वतःच्या पुत्राचा त्याग का केला? कोणत्या दोषामुळे तो त्याग करण्यास पात्र होता ?

३३. पूर्वी जे शंकराने जे सांगितले, तेच आता सूत सांगत आहे शैवीला ?? असंमज नावाचा ख्यातवान पुत्र झाला. पूर्वीचे वैर स्मरणार्‍या कोण्या एका पाप्याने त्याच्यात प्रवेश केला.

३४. पुढील जन्मी तो पुष्कळ व्यापार करणारा असा वैश्य झाला. स्वतःच्या कर्तव्यात मग्र असणारा तो संयमी, सौजन्यपूर्ण व पवित्र होता.

३५. एकदा, प्रातर्विधीसाठी त्याने देविका नदीच्या तीरावरील जमीन खणली. तेव्हा त्याला यक्षसूत्रासहित असलेला मोठा ठेवा सापडला.

३६.-३७. ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या त्याने तो ठेवा घेण्याचे ठरवले. त्यावेळी त्या ठेव्याचा रक्षणकर्ता असलेल्या लुब्धक नावाच्या पापी यक्षाने म्हटले-  “हे निष्पाप माणसा, भुकेलेल्या मला खाण्यासाठी प्राणी दे. त्यानंतर मी दिलेला हा ठेवा तू घे.”

३८. हे कुरुकुलोद्भवा, ‘मी देतो' असे म्हणून त्या वैश्याने तो ठेवा घेतला. पण दुष्ट बुध्दीने विसरून जाऊन त्याने त्या यक्षाला पशू काही दिला नाही.

३९.-४०. त्यानंतर भुकेलेला तो वनात नाहीसा झाला. पापी असा तो लुब्धक नावाचा यक्ष नाहीसा झाला असता, हे नृपश्रेष्ठा, तो वैश्य कालांतराने मरण पावला. सगर राजाच्या शैवी नावाच्या पत्नीच्या पोटी जन्माला आला.

४१. इक्ष्वाकू वंशात तो असंमज नावाने प्रसिध्द झाला. बालपणी खेळत असताना (यक्षाचे ) ते भूत त्याच्यात शिरले.

४२.-४३. त्या भूताने त्याच्यात प्रवेश केल्यामुळे तो महातेजस्वी असमंज क्रूर बनला. अतिशय पापी, सामर्थ्यशाली अशा असमंजाने बळेच नगरातील लोकांच्या अनेक लहान मुलांना नदीत फेकले. त्याचे ते कृत्य जाणून प्रजाजनांनी ताबडतोब ते राजाला सांगितले.

४४.-४५. त्याविषयीचे कथन ऐकून, राजाने त्या पुत्राचा (असमंजाचा) त्याग केला. हे पुत्रा, स्वतःच्या पापामुळे ज्याचा त्याग केला गेला आा त्याने भुकेने त्रस्त होऊन आपलेच मांस उकरून खाल्ले. त्या भयंकर अरण्यात तो असमंजस ?? मरण पावला.

४६. त्याचा पुत्र अंशुान नावाने विख्यात होता. ज्याला हे सगळी कहाणी सांगितली गेली, तो अंशुान आपल्या पित्याच्या पित्याला (आजोबांना) म्हणाला-

४७. ‘हे राजा, मी अश्वाला घेऊन येईन. चिंता करू नये.’ असे म्हणून तो तात्काळ वरुणाचे निवासस्थान असलेल्या समुद्राकडे गेला.

४८.-५०. पृथ्वी खणत खणत ज्या मार्गाने ते सगरपुत्र गेले, त्या मार्गाने जाऊन नरसिंह, पुत्रांमध्ये श्रेष्ठ अशा त्या असमंजाच्या पुत्राने तिथे पाताळात अग्रीप्रमाणे तळपणार्‍या कपिल मुनींना आणि त्यांच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या पवित्र अश्वाला त्याचप्रमाणे भस्मीभूत झालेल्या आपल्या पितरांना पाहिले. हे कुरुनंदना, नंतर तो अंशुमान अतितेजस्वी अशा कपिलांजवळ गेला.

५१. हे राजा, त्या अंशुमानाने हात जोडून, मस्तक लववून त्यांना नमस्कार केला. त्यानंतर, ‘हे ब्रह्मन, मला आसरा द्या'', असे त्याने म्हटले.

५२. प्रसन्न झालेल्या कपिलांनी त्याला आदरपूर्वक म्हटले, ‘वर माग. हे महा बुध्दिमान राजा, जे जे तू मागशील, ते ते मी देईन.’

५३. तेव्हा त्याने अश्व व पितरांची गती मागितली. ते ऐकून योगी कपिलांनी अंशुमानाला म्हटले,

५४.-५५. ‘हे निष्पाप राजा, जर कोणा पुरुषाने स्वर्गातून गंगेला आणून तिच्या पाण्याने हा भाग भरून टाकला आणि मग त्या पाण्याने पितृतर्पणादी क्रिया संपन्न केल्या तर ते पितर स्वर्गाला जातील. अन्यथा नाही. हे नरोत्तमा, हा अश्व घेऊन तू घरी जा.

५६. हे महाभागा, त्या महान सगराचा यज्ञ पूर्ण करून, तू लवकरच त्या सगराचा अधिकृत नातू होशील.

५७.-५८. हे भरतवंशीया, त्यामुळेच तारलेले सर्व सगरपुत्र स्वर्गाला जातील.'' अशा प्रकारे, त्याचे हे बोलणे ऐकून, अंशुमानही त्या कपिलांना प्रणाम करून, ‘ठीक आहे', असे म्हणून आपल्या घरी गेला. हे राजा, ?? तात्काळ जवळ गेला.

५९. महातेजस्वी अशा अंशुमानाने आपल्या आजोबांना मस्तक लववून नमस्कार केला. तसेच त्या अश्वाचा व सगरपुत्रांचा सर्व वृत्तांत निवेदन केला.

६०. तो सगर राजा त्या अश्वाला पाहून अत्यंत आनंदित झाला. मस्तकाचे अवग्राहण करून तो राजा त्याला म्हणाला, ‘मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे.''

६१.- ६२.त्यानंतर त्या महातेजस्वी राजाने यथायोग्य पध्दतीने यज्ञ पुरा केला. त्यानंतर अवभृतस्नान केलेला तो सगर राजा ऋत्विक व पुरोहितांसह राज्यावर अंशुमानाला अभिषेक करून, तपश्चर्या करण्याचा निश्चय करून, सर्वांची संती घेऊन वनात गेला.

६३. तेजस्वी अंशुमानाने पृथ्वीचे पालन केले. अत्यंत संयमी अशा त्याने समुद्र, वन व द्वीपांसह साम्राज्य प्रस्थापित केले.

६४. त्याचा दिलीप नावाचा महान पुत्र विख्यात होता. ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीला प्रकाशमान करतो, त्याप्रमाणे त्याने आपल्या गुणांनी आपल्या वंशाला उज्ज्वल केले.

६५. सर्व गुणसंपन्न अशा आपल्या या दिलीप नावाच्या पुत्राला राज्यावर अभिषिक्त करून अंशुमान वनात गेला.

६६.-६७. महातेजस्वी अशा दिलीपानेही पित्याप्रमाणे राज्य केले. हे पुत्रा, त्यालाही पुत्रांमध्ये श्रेष्ठ, तिन्ही लोकांमध्ये विख्यात असा भगीरथ नावाचा पुत्र झाला. तो सत्यवादी, चारित्र्यवान, गुणी व ब्राह्मणप्रिय होता.

६८. तो तेजामध्ये सूर्यासमान आणि क्षमेत पृथ्वीसमान, पराक्रमात विष्णुसमान आणि क्रोधात यमासारखा होता.

६९.-७०. ऐश्वर्यात तो वैश्रवण होता, तर रूपात तो प्रत्यक्ष कामदेव होता. हे राजा, सर्वगुणसंपन्न, महारथी अशा आपल्या पुत्राला बघून त्याला बोलावून असे म्हटले, ‘हे पुत्रा, माझे बोलणे ऐक, जे गुरू कपिलांनी सांगितलेले असल्यामुळे अनुल्लंघनीय आहे.

७१. हे पुत्रा, रमणीय अशा महान राज्यावर तुला अभिषिक्त करतो. यापुढे मी तप करू इच्छितो. तेव्हा तू विघ्न निर्माण करू नकोस.

७२. पितरांना तारण्यासाठीच तो राजा ??’ असे म्हणून तो राजा पुत्राला अभिषेक करून वनात गेला.

७३. त्या राजाने गंगेला खाली आणण्यासाठी प्रयत्न केले. अतिशय तेजस्वी अशा त्याने शंकराला तपाने पूजिले.

अध्याय १ ते २०