अध्याय १६ - सागरेश्वरवर्णनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय १६ - सागरेश्वरवर्णनम्‌

१. देवांनी म्हटले- हे श्रेष्ठ विप्रा, तू आमचा धाता, विधाता आणि त्राता आहेस. हे मुनिश्रेष्ठा, दैत्यांपासून निर्माण होणार्‍या मोठ्या भयापासून आमचे रक्षण कर.

२. हे द्विजोत्तमा, (स्वर्गादी) सर्व लोकांवर व देवांवर दया कर. हे चराचर त्रैलोक्य कालेयांच्या भीतीमुळे उध्वस्त झालेले आहे.

३. हे मुनीश्वर विप्रा, तपाचर्येच्या बळावर तू या त्रैलोक्याचे रक्षण केले आहेस. हे विप्रा, पापकर्मी कालेय पापकर्मांध्ये मग्र आहेत.

४. दुर्ग अशा समुद्राचा आश्रय घेऊन ते रात्रीत प्रजेचे भक्षण करतात. दिवसा ते समुद्रात निर्भयतेने व सुखाने राहतात.

५. हे प्रभू ब्राह्मणश्रेष्ठा, त्यांनी भक्षण केल्यामुळे प्रजेचा क्षय झाला आहे. कालेयांपासून भयभीत झालेल्या अशा आमचा आधार हो.

६. आमच्या कल्याणासाठी समुद्राचे जल तात्काळ प्राशन कर. तुलाच समुद्राचे प्राशन करणे शक्य आह, अन्य कोणालाही नाही.

७. हे श्रेष्ठ, सुव्रत द्विजा, म्हणून आमच्यावर कृपा कर. हे विप्रा, आपल्यासारखे लोक विश्वाचे रक्षण करायला समर्थ असतात.

८.-९. सूताने म्हटले- असे त्यांचे बोलणे ऐकून भगवान अगस्त्य ऋषींनी म्हटले- ‘लोकांच्याहिताच्या इच्छेने मी तसे करीन.' असे म्हणून तपश्चर्येने ज्यांचे तेज अधिक उजळलेले आहे, असे अगस्त्य गंधर्व, यक्ष, तसेच मानव व सरपटणार्‍या प्राण्यांसह त्यांच्याबरोबर गेले.

१०. श्रीमान अगस्त्य विप्र ऋषींसह तसेच त्रैलोक्यासकट वरुणाचे निवासस्थान असलेल्या, सरित्पती अशा समुद्राकडे निघाले.

११. हे राजा, त्यावेळी, समुद्र प्राशन करण्याची इच्छा असणार्‍या त्यांनी म्हटले- हे देवांनो, समुद्राचे सर्व पाणी मी एका क्षणात पिऊन टाकतो.

१२.-१३. तुम्हाला जे काही विधिवत्‌ करायचे आहे, ते तुम्ही करावे. असे म्हणून, हे कुरुश्रेष्ठा, युगांताच्या अग्रीसमान ज्याचे तेज आहे, अशा अगस्त्यांनी आपल्या मुखाचा आ वासून ते सर्व जल प्राशन केले. कोरड्या लाकडावर अग्री पडला असता ते जसे जळून खाक व्हावे, तद्वत, वरुणालयातले म्हणजेच समुद्रातले पाणी शुष्क झाले.

१४. हे भरतश्रेठा, क्षणार्धात ते पाणी अगस्त्यांच्या मुखाने ओढून घेतले. हे सुता, अगस्त्यांच्या तेजामुळे ते सर्व पाणी लयाला गेले.

१५. ज्याप्रमाणे वार्‍यासह असलेला अग्री क्षणार्धात लाकडाला जाळून टाकतो, त्याप्रमाणे सर्व जल व समुद्र गिळून टाकले.

१६. ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या सर्व भूतांनी अगस्त्य मुनींची स्तुती केली. त्या सर्वांकडून ज्यांची प्रशंसा केली जात आहे अशा त्या भगवान अगस्त्य ऋषींनी सर्व लोक बघत असताना समुद्र निर्जल केला.

१७. हे राजा, त्यावेळी देवांनी त्या अगस्त्यांना वंदन करून, आपली उत्कृष्ट अशी शस्त्रे बाहेर काढून व धारण करून समुद्रात प्रवेश केला आणि अतिशय पराक्रमी अशा आदितोय राक्षसांना शोधून काढून त्यांना ठार मारले.

१८. त्या बुध्दिमान अशा देवांकडून मारले जाणारे, सर्व देवांच्या नयनांना प्रक्षुब्ध करणारे ते निशुंभ, शुंभ व इतर दितीचे पुत्र (राक्षस ) क्षणार्धात सत्त्वहीन झाले.

१९. देवांकडून मारले गेलेले ते ८० हजार राक्षस समुद्रात पडले आणि उरलेले निस्तेज होऊन आपल्या स्त्रियांसह पाताळात गेले.

२०. नंतर, इंद्र ज्यांमध्ये प्रमुख आहे अशा देवांनी कालकेयांना ठार मारून, आनंदित होऊन श्रेष्ठ अशा अगस्त्य मुनींचे पूजन केले.

२१. हे राजेंद्रा, यक्ष, किन्नर, मानव यांनी ऋषींसह त्या ऋषींचे आनंदाने स्तवन केले.

२२. प्रभू, त्यानंतर ऋषी व देवांच्या समूहाने पुन्हा त्या मुनींना म्हटले- हे द्विजश्रेष्ठा, आपल्या कृपाप्रसादामुळे इंद्र निःशत्रू झाला आहे.

२३. हे मुनिश्रेष्ठ, ब्रह्मदेवाने जसे निर्माण केले आहे, अशा त्रैलोक्याचे इंद्र पालन करेल. आपल्या कृपेुळे आम्ही निश्चिंत होऊन राहू.

२४. हे मुनी विप्रा, वरुणाचे आलय आणि सर्व प्राणिमात्रांचे आश्रयस्थान असलेला हा निर्जल समुद्र पुन्हा पाण्याने भरून टाका.

२५. असे त्यांचे बोलणे ऐकून, भगवान अगस्त्य ऋषींनी हास्याचा गडगडाट करून असे म्हटले-

२६. हे श्रेष्ठ देवांनो, आता जे मी पाणी प्राशन केले, ते चित्रातल्या सूर्याला अर्पण केलेल्या लाकडांच्या मोळीप्रमाणे होते.

२७. माझ्यामध्ये जिरलेले ते पाणी भस्मवत झालेले आहे. त्यामुळे, हे देवांनो, हा समुद्र माझ्याकडून पुन्हा पाण्याने भरला जाणे शक्य नाही.

२८. हे देवांनो, या समुद्राला पाण्याने भरला जाण्यासाठी दुसर्‍या उपायाविषयी विचार करा. हे पहा, मला हे शक्य नाही.

२९. असे त्यांचे बोलणे ऐकून, देव, असुर, मोठे सरपटणारे प्राणी जलाधिप वरुणाला पुढे करून ब्रह्मदेवाला शरण गेले.

३०. त्यानंतर ब्रह्मदेवाजवळ येऊन त्या श्रेष्ठ देवांनी त्याला म्हटले- हे भगवान, समुद्र पुन्हा पाण्याने कसा भरेल ?

३१.-३२. हे भगवान, तो भरण्यासाठी आम्हाला उपाय सांगा. त्यानंतर जगताचा स्वामी असलेल्या ब्रह्मदेवाने समुद्र भरण्यासाठी उपाय जाणून, भावी महान कार्यासंबंधी देवांना असे म्हटले- ‘हे देवांनो, समुद्राला भरून टाकण्यासाठी माझे म्हणणे ऐका.

३३.-३४. आता मी तुम्हाला उपाय सांगतो, त्याप्रमाणे पाण्याचा साठा करा. समुद्राच्या पश्चिम किनार्‍यावर शिवाचे आवडते उत्तम असे गोकर्ण क्षेत्र आहे. त्या ठिकाणी जाऊन पाण्याचा साठा करण्यासाठी शिवाचे लिंग प्रस्थापित करून नेमाने तप करा.

३५.-३६. त्यामुळे शंकराच्या कृपेने त्या तपाची पूर्ती होईल.' असे ब्रह्मदेवाने म्हटल्यावर इंद्रासहित सर्व देव संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले. त्या उत्तम अशा गोकर्ण क्षेत्रात समुद्रही गेला.

३७. हे पुत्रा, (सविधेः ? ) पापस्थालीच्या आग्रेय दिशेला जाऊन, तेथे आश्रम तयार करून त्याने शंकराचे लिंग ह्न थापन केले.

३८. मौन धारण करून, ध्यानमग्र अशा त्याने पुष्कळ काळ तप केले. बध्दपद्मासनात राहून, त्याने हृदयात सतत शंकराचे चिंतन केले.

३९. हे राजा,अशा प्रकारे तप करणार्‍या त्या महान सागरावर पार्वतीपती पार्वतीसह प्रसन्न झाला.

४०.-४१. शंभूने आदरपूर्वक सागराला म्हटले, ‘वर माग.' आणि नंतर पार्वतीपती प्रसन्न झाला आहे, असे जाणून, विविध स्तोत्रांनी स्तवन करून व नमस्कार करून समुद्राने म्हटले, ‘हे प्रभो देवेश, जर तू संतुष्ट असशील, तर वर  द्यावास.'

४२.-४३. हे प्रभो, कालकेय नावाच्या दैत्यांनी दिवसा माझ्यात प्रवो करून रात्री लोकांना ठार केले. त्यांचा नाश करण्यासाठी पूर्वी घटातून जन्मलेल्या अगस्त्यांनी माझे जल संपूर्णपणे प्राशन करून जिरवून टाकले आहे. त्यामुळे हे परमेश्वरा, माझा देह शुष्क झाला आहे.

४४. हे जगत्पते, ज्यायोगे मी पूर्णपणे भरून जाईन, तसे काही तरी कर. हे देवा, हा माझा आश्रम त्रैलोक्यात विख्यात होवो.

४५. हे सुरश्रेष्ठा, मी तयार केलेले हे तीर्थ आणि लिंग तुझ्या कृपेमुळे सर्व लोकांच्या इच्छा पूर्ण करणारे होवो.

४६. अशा प्रकारचे समुद्राचे बोलणे ऐकून त्रिभुवनांचा ईश्वर असलेल्या करुणाकर देवाने सौम्य अशा समुद्राला म्हटले-

४७.- ५०. शंकराने म्हटले, ‘सूर्य वंशात जन्मलेला भगीरथ नावाचा राजा आहे. तो श्रेष्ठ राजा आपल्या पितरांचा उध्दार करण्यासाठी खात्रीने गंगेला आणेल. तेव्हा तू पूर्णपणे भरून जाशील. हे विभो, तू तयार केलेले हे महान लिंग व तीर्थ सागरेश्वर नावाने त्रैलोक्यात प्रसिध्द होईल. येथे येऊन जो माणूस श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्रावर अतिशय शुध्द अशा या तीर्थात स्नान करून सागरेशाची पूजा करेल, त्याच्या इच्छेची निश्चितपणे पूर्तता होईल, यात संशय नाही.'

५१.- ५४. असे म्हणून भगवान शंभू तेथेच अंतर्धान पावला. त्यावेळी शंकरापासून इच्छित वर प्राप्त करून सागर सुध्दा ब्राह्मणांसमवेत अत्यंत आनंदाने आपल्या ठिकाणी परत गेला. हे राजा, शतशृंग पर्वताच्या खालच्या बाजूला व ब्रह्मेश्वराच्या पश्चिमेला ते पापनाशक सागरतीर्थ आहे. हे श्रेष्ठ राजा, तिथे स्नान करून विधिपूर्वक भक्ती करून राजसूय यज्ञाचे फळ मिळवतो आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त करतो.

अध्याय १ ते २०