अध्याय १५ - पातालादिवर्णनम्‌ - कालकेयपीडावर्णनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय १५ - पातालादिवर्णनम्‌ - कालकेयपीडावर्णनम्‌

१. कुमाराने म्हटले- हे परमेश्वरा, पाताळांसंबंधी त्याचप्रमाणे त्यांमध्ये राहणार्‍यांविषयी सविस्तर सांगा.

२.-३. सुताने म्हटले- हे राजा, आता मी तुला पातालांविषयी सांगतो. ते तू एकाग्रतेने ऐक. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल तसेच सातवा पाताल हे ते सात पाताळ होत.

४. पूर्वी सांगितल्याप्रमाणे असंख्य योजने खाली असे हे पाताळ आहेत. तत्त्वदर्शी लोकांनी त्यांचा विस्तार स्वर्गादी लोकांहून दुप्पट आहे, असे म्हटले आहे.

५. ज्याची खोली अगाध आहे व तळ सुवर्णय आहे असा अतल आहे. हे राजेंद्रा, तिथे शेषादी उत्तम असे नाग राहतात.

६. बळी इत्यादी दैत्य त्याठिकाणी राहतात. सूर्यकांत मण्याच्या महान तेजामुळे हा अतल लोक तेजस्वी झाला आहे.

७. तिथे दिव्य भोगांनी युक्त असे दैत्येंद्र निवास करतात. तसेच, हे नरशार्दुला, रमणीय असे नाग आपल्या स्त्रियांसह राहतात.

८. ते त्या ठिकाणीच आपापली आवड व इच्छा यांना अनुसरून क्रीडा करतात. रसातलातील भोगांना देवांनी शतगुणी म्हटले आहे.

९. हे कुरुकुलोद्भवा, या सर्व पाताळांध्ये जरामरणादी नाही. हे भारता, येथील स्त्रीपुरुषांचे देह १६ वर्षीय युवकांप्रमाणे दिसतात.

१०. हे कुरुकुलोद्भवा, येथील दान हे रज व तमोगुणांनी युक्त असते. सात्त्विक गुणाशिवाय दिलेले दान हे त्यांच्या भोगांसाठी असते.

११. वितलामध्ये विपुलोम आदी असुर राहत असत. हे राजेंद्रा, तेथील सर्व जमीन खडकाळ आहे.

१२. हे राजा, त्याच्याखाली सुतल आहे. हिरण्याक्षादी असुरांनी येथे वास केला होता. नितल हे अतिशय विशाल आहे असे म्हटले आहे.

१३. हे राजा, हे नितल नील रत्नांनी युक्त व सर्व भोगांनी परिपूर्ण असून तिथे कालनेमी, पुरोगम इत्यादी असुरांनी आश्रय घेतला होता.

१४. हे सुरश्रेष्ठा, या नितलाच्या खाली तलातल असून विश्वकर्म्याने याची भूमी रत्नजडित केली.

१५. हे राजा, येथे प्रह्लाद इत्यादी प्रमुख दैत्यांनी वास केला होता. हे राजा, महातल नावाचे सातवे पाताल मानले आहे.

१६.-२०. हे कुरुश्रेष्ठा, नमुची इत्यादी असुर त्या पाताळामध्ये राहतात. त्या सर्वांच्या १०००० योजने खाली हे कुरुकुलोत्पन्न राजेंद्रा, अतिशय घोर असे ३२ नरक आहेत. त्यांविषयी ऐक. घोराष्ण, रौरव, महारौरव, पूतिक, यमी, गिरिसुता, अवीची, सुतनू, गीतका, कालसूत्रा, सकृमी, अस्थिपद्म, महारौद्र, कुंभीपाक, अंबरीषक, करपत्रविहार इत्यादी नरकांविषयी तुला सांगितले. ३२ नरकांच्या समूहापैकी मुख्य मुख्य तुला कथन केले. निसर्गतःच अत्यंत दुर्ग असे ते पापी लोकांना मिळतात.

२१. हे नरक नाना यातनांनी युक्त, अतिशय घोर आणि भयावह आहेत. यमाचे सेवक पापी लोकांना त्यांमध्ये टाकून शुध्द करतात.

२२. स्वतःची दुष्कृत्ये आठवत ते पापी लोक इकडे तिकडे आक्रोश करत फिरतात. जोपर्यंत त्यांच्या पापाचा क्षय होत नाही, तोपर्यंत ते तेथे राहतात.

२३. त्या नरकांच्या खाली १०० योजने परिमाण असलेला विदेश आहे. त्याच्या पलिकडे, खालच्या बाजूला तो कोश आहे असे म्हणतात.

२४. हे राजा, जगत्पतीचा तो जगत्कोश विश्वाचा आधार आहे. अष्टमूर्ती अशा त्या महात्म्याची दहा दिशांध्ये दहा निवासस्थाने आहेत.

२५. हे राजेंद्रा, विद्वान लोक त्याला ब्रह्मांड असे म्हणतात. हे राजा, पूर्वी परमात्मा स्वतःच तो कोश झाला होता.

२६. त्या कोशाच्या अंतर्गत सर्व विश्व समाविष्ट आहे.?? तिथे सर्व ऋषी व देवगण सदैव संचार करतात.

२७. कुमाराने म्हटले- हे देवा, १४ लोकांविषयी तुम्ही मला विस्ताराने सांगितले. तसेच सप्त सागरांविषयीही कथन केले.

२८. तरी सुध्दा माझ्या मनात जे ऐकायची इच्छा झाली आहे ते म्हणजे समुद्रांना ‘सागर' असे नाव का पडले, त्याविषयी मला सांगावे.

२९. शंकराने म्हटले- हे सौम्या, तू चांगला प्रश्न विचारलास. मी थोडक्यात तुला सांगतो. हे पुत्रा, देवांनी महातपस्वी अशा कुंभयोनीला प्रार्थना केली.

३०.-३२. त्यानुसार, त्याने सर्व समुद्र पिऊन टाकून तो निर्जल केला. त्यावेळी सूर्यकुळात जन्मलेल्या सगर नावाच्या राजाने पुष्कळ दक्षिणेचा अंतर्भाव असलेला श्रेष्ठ असा अश्वमेध यज्ञ केला. त्याचे ६०००० पुत्र पित्याच्या आदेशानुसार अश्वाचे रक्षण करण्यासाठी बाहेर पडले. सर्व लोकांमध्ये त्यांनी भ्रण केले. हे सुरश्रेष्ठा, त्यावेळी गुप्त रूपात इंद्राने त्या अश्वाचे हरण केले.

३३.-३४. त्या ह्न अश्वाला त्याने कपिल ऋषींच्या आश्रमात ठेवले. त्यावेळी अश्व न दिसल्यामुळे अतिशय खवळलेले ते सगरपुत्र भूलोकी व त्याच्याही वर असलेल्या स्वर्गामध्ये त्याला शोधू लागले. तिथेही अश्व न दिसल्याने ते पाताळात जायला उद्युक्त झाले.

३५.-३६. हे राजा, त्यावेळी पृथ्वी खणून ते पाताळात शिरले. तिथे पाताळात सर्वत्र शोधून शेवटी सगरपुत्रांना तो अश्व कपिलांच्या आश्रमात सापडला. महाबलशाली असे ते ‘कपिल चोर आहे' असे म्हणून त्यांना ठार मारावयास उद्युक्त झाले.

३७.-३८. पतंगाप्रमाणे ते सर्व सगरपुत्र कपिलांच्या क्रोधाग्रीत जळून खाक झाले. पण सगराचा नातू भगीरथ याने तपश्चर्या करून गंगेला खाली आणून वरुणाचे निवासस्थान असलेल्या समुद्राला भरून टाकले. हे सुरोत्तमा, म्हणून समुद्राला ‘सागर' असे नाव पडले.

३९.-४२. हे प्रभो, तेव्हा गोकर्णासकट सर्व काही जलमय झाले. त्यावेळी, त्या गोकर्णावर राहणारे, दुःखशोकात बुडालेले श्रेष्ठ असे ऋषी व ब्राह्मण ते स्थान सोडून सह्य पर्वतावर आले. हे कुरुश्रेष्ठा, सह्याद्रीवर राहणार्‍या त्या ऋषींनी विविध प्रकारे तपश्चर्या करून विष्णूला प्रसन्न केले. त्यावेळी प्रसन्न झालेल्या भगवान जनार्दन हरीने परशुरामरूपाने सह्याद्रीचा एक भाग वर उचलून पुन्हा त्यांना दिला. हे सर्व मी तुला सांगितले आहे. आणखी काय सांगू ?

४३. शतानीकाने म्हटले- पूर्वी कोणत्या कारणाने अगस्त्याने समुद्र पिऊन टाकला ? अगस्त्याचे तपोबल अतिशय अद्भुत आहे असे मला वाटते.

४४.-४५. मगरींचे आगार असलेला समुद्र पुन्हा कसा भरून गेला ? त्या सगर राजाने अश्वमेध यज्ञ कसा केला? हे महामते, त्याने तो यज्ञीय अश्व पुन्हा कसा मिळवला? हे तू मला साकल्याने सांग. आम्ही सर्व ते ऐकू इच्छितो.

४६. सूताने म्हटले- हे कुरुश्रेष्ठा, ही पौराणिक कथा ऐक. देवांचे शत्रू असलेले असुर ‘कालेय' नावाने विख्यात होते.

४७. हे कुरुश्रेष्ठा, महासुरांनी समुद्रावर येऊन वृत्राला ठार मारल्यावर त्रैलोक्याच्या नाशासाठी यजन केले.

४८.-४९. काळाने प्रेरित झालेल्या कालेयांबरोबर रात्री बाहेर पडून ध्यानमग्र अशा मुनींच्या आश्रमांध्ये येऊन त्यांनी थंड डोक्याने, तपस्वी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांना सपत्नीक ठार मारले.

५०. प्रत्येक रात्री बाहेर येऊन आपल्या बळावर ते त्या लोकांचे भक्षण करत. दिवसा समुद्रात लपून राहिल्यामुळे ते अजिबात दिसत नसत.

५१. अशा प्रकारे एक हजार वर्षांपर्यंत निर्घृण असे ते पापकर्मं करत राहिले. त्यामुळे त्रैलोक्यात वावरणारी सर्व प्रजा नष्ट झाली.

५२. पृथ्वीवर जिकडे तिकडे हाडेच हाडे पसरलेली होती. हे कुरुश्रेष्ठा, भूत व वेताळांनी व्यापलेली अशी ती निर्मनुष्य झाली होती.

५३. हे शतानीका, त्यावेळी भयाकुल असे ते सर्व देव गंधर्व व ऋषींसह उद्विग्र झाले.

५४. त्यांची गती देवादिकांना माहीत नव्हती. त्यामुळे ते कोठून प्रकट होतात, हे ठाऊक नसल्यामुळे इंद्रासह ते सर्व देव ब्रह्मदेवाला शरण गेले.

५५. ‘आमचे संरक्षण करा' असे ते पुन्हा पुन्हा आर्ततेने विनवत होते. ते ऐकून भगवान ब्रह्मदेव देवांना म्हणाला-

५६. वृत्राचा वध झाल्यावर कालकेयांनी जळाचा साठा असलेल्या समुद्राचा आश्रय घेतला. जिंकण्यास कठीण असे ते लोकांचा विध्वंस करण्यात मग्र झाले.

५७. म्हणून, हे देवांनो, तुम्ही तपोनिधी अशा कुंभयोनी (अगस्त्य) कडे जा. कारण तोच समुद्राचे शोषण करण्यास समर्थ आहे. अन्य कोणीही नाही.

५८. अगस्त्याने जलाचे प्राशन केल्यानंतर, हे देवांनो, दुराचारी अशा कालकेयांना ठार मारा. याशिवाय दुसरी कोणतीही शक्यता नाही.

५९.-६०. असे त्याचे बोलणे ऐकून, त्या महात्म्यासह आणि ऋषिगणांसह ते देव अगस्त्याकडे गेले. बसलेल्या त्या अगस्त्य ऋषींना वंदन करून ते देव त्याला असे म्हणाले.

अध्याय १ ते २०