अध्याय १४ - भुवर्लोकादिवर्णनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय १४ - भुवर्लोकादिवर्णनम्‌

१. कुमाराने म्हटले- सप्त लोकांविषयी, ग्रहांच्या स्थितीविषयी तसेच पाताळांविषयी जसे आहे तसे सांगावे.

२. शंकराने म्हटले- खालच्या बाजूला असलेल्या भूलोकादी सप्त लोकांविषयी, तसेच वर असलेल्या सप्त लोकांविषयी अनुक्रमे सांगतो.

३. या श्रेष्ठ मुनींनी पाताळांबरोबरच भूलोक व त्याच्या पाठोपाठ भुवर्लोकाविषयी सांगितले आहे.

४. हे राजा, सूर्याच्या खाली व भूमीच्या वर एक लक्ष योजने परिमित असलेला जो लोक आहे, त्याला विद्वान भुवर्लोक म्हणतात.

५. हे सुरश्रेष्ठा, विमानाने संचार करणार्‍या रुद्र, वसू, सूर्य आदी देवांची ही निवासभूमी आहे.

६. हे सुरश्रेष्ठा, त्याच्यानंतरचा सूर्यापासून सुरू होणारा व चंद्राच्या खाली असलेला जो लोक आहे, त्याला स्वर्लोक म्हणतात.

७. देवतांचा आश्रयस्थान असणारा हा स्वर्लोक एक लक्ष योजने विस्तृत आहे. त्याच्यापासून एक लक्ष योजने अंतरावर तारकांचे तेज विकसित करणारा सूर्य आहे.

८. हे राजा, त्याच्यापासून दोन लक्ष योजनांवर जो ग्रह आहे, त्याला बुध म्हणतात. बुधाच्या दोन लक्ष योजने अंतरावर असलेल्या ग्रहाला शुक्र म्हटले आहे.

९. त्याच्यापासून दोन लक्ष योजने अंतरावर भौम (मंगळ) आहे. त्याच्यापासून? देवांचा पुरोहित म्हणजेच गुरू आहे. त्याच्यापासून दोन लक्ष योजने अंतरावर सूर्यपुत्र शनी आहे.

१०. शनीच्या पलीकडे एक लक्ष योजने अंतरावर हे सिध्दिवत्सला राजश्रेष्ठा, सिध्द अशा सात मुनींचे मंडल आहे.

११.-१२ त्या मंडलापासून एक लक्ष योजने अंतरावर शिंशुमार आहे. शिंशुमारापासून खाली व सूर्याच्या वर जो लोक आहे, त्याला स्वर्लोक असे नाव आहे आणि ते ग्रहांचे मोठे आश्रयस्थान आहे. या लोकात २८ कोटी (छोटे-मोठे) ग्रह संचार करत असत.

१३. ग्रहांची व मरुतांची विमाने होती. हे सुरश्रेष्ठा, ते ग्रह व मरुत्‌ सुध्दा १०००० योजने परिमित होते.

१४. हे सुरश्रेष्ठा, वाहणार्‍या एका प्रकारच्या वायूचे नाव आवह आहे. मेघांपासून पृथ्वीच्या वरपर्यंत वाहणारा वायू हा प्रवह होय.

१५. कुरुश्रेष्ठा, मेघांपासून ते सूर्याच्या मार्गापर्यंत जो वाहतो, तो उद्वह व त्यानंतर, चंद्रापासून वाहणारा प्रसन्न होय.

१६.-१७. ग्रहांच्या मंडलापासून ते तार्‍यांपर्यंत वाहणारा तो विवह. हे महाभागा, सप्तर्षी मंडल व ग्रहांपासून जो मरुत्‌ वाहतो, त्याला परावह असे म्हटले आहे. सप्तर्षींपासून ते शिंशुमारापर्यंत वाहणारा वायू हा परिवह होय.

१८. हे राजा, सात भागांधल्या वायूंविषयी सांगितले. त्याच्या पलिकडे जो लोक आहे, त्याला विद्वान महर्लोक असे जाणतात.

१९.-२०. याचा विस्तार स्वर्लोकाच्या वर एक कोटी योजने आहे. वासनारहित, योगमार्गाचा अवलंब करणारे इंद्रादी देव त्यामध्ये राहतात. हे शत्रुतापना, त्याच्या पलिकडे जो लोक आहे, तो जनर्लोक नावाने प्रसिध्द आहे.

२१.-२२. ब्रह्मलोकामध्ये राहणार्‍यांच्या पलिकडे (ब्रह्मलोकापलिकडे) २ कोटी योजने परिमाण असलेला जनर्लोक आहे. दक्ष, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगू आणि इतर तिथे राहणारे निवासी आहेत. त्याच्यापलिकडे ४ कोटी योजने परिमाण असलेला असा तपोलोक सांगितलेला आहे.

२३. हे राजेंद्रा, त्या लोकात सनत्कुमार, सनक, सनंद इत्यादी ब्रह्मदेवाचे १० पुत्र राहतात.

२४. हे महाराज, त्याच्याही पुढे ६ योजने परिमाण असलेला सत्यलोक सांगितलेला आहे. तो स्वर्गांचे शिखर म्हणून ओळखला जातो.

२५. हे कुरुकुलोद्भवा, त्याची प्राप्ती म्हणजे अमल मुक्ती असे म्हटले जाते. असे म्हणतात की तिथे गेल्यावर जगताचा धाता असलेल्या विष्णूच्या नाभीतील कमळ विकसित झाले.

२६. हे जगतीपते, त्यातून पद्मयोनी ब्रह्मा निर्माण झाला. हे राजा, त्याच्यापासूनच चार प्रकारची भूतमात्रे निर्माण होतात.

२७. ते दिव्य असे ब्रह्मभवन मुनींचे विशाल असे निवासस्थान आहे. तिथे अनुपमेय असे ब्रह्मदेवाच्या चतुर्मुखावरील तेज विलसत आहे.

२८. त्या भवनात सर्वांचा प्रपितामह असा ब्रह्मदेव सृष्टिनिर्मितीविषयी चिंता करे. हे कुरुश्रेष्ठा, त्या भवनाच्या पलिकडे विशाल व भयावह असे सिध्दांचे ठिकाण आहे.

२९. हे राजा, त्या ठिकाणाच्या वरील बाजूला जोडूनच २ कोटी योजने परिमाण असलेले स्थान हे शिवाच्या योगाचा आधार आहे.

३०. तुला भिन्न लोकांचा विशाल विस्तार तसेच तिथे राहणार्‍या जनांविषयी थोडक्यात सांगितले आहे. आता दुसरे काय ऐकू इच्छितोस?

अध्याय १ ते २०