अध्याय ०५ - स्वायंभुवमनोरुत्पत्तिः- तेन स्वप्रजाद्वारा सृष्टिः

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय ५ - स्वायंभुवमनोरुत्पत्तिः- तेन स्वप्रजाद्वारा सृष्टिः

१. कुमाराने म्हटले- 'हे तात, स्वायंभुव मनूची उत्पत्ती कशी झाली ते सांगा. तसेच त्या मनूपासून क्रमाने देव कसे निर्माण झाले, याविषयीही सांगा.'

२. शंकराने म्हटले- प्रजा निर्माण करण्याचा ध्यास घेतलेल्या अव्यक्तजन्मा ब्रह्मदेवाने प्रजा निर्माण करण्याचा निश्चय केला. तदनुसार साक्षात मनूचा जन्म झाला.

३. त्यानंतर, त्या भगवंताने शतरूपा नावाची स्त्री उत्पन्न केली. पित्याच्या आदेशानुसार, स्वायंभुव मनू देवाने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

४. - ५. त्या पुरुषाच्या संबंधापासून शतरूपा देवी प्रसूत झाली आणि तिने प्रियव्रत व उत्तानपाद या दोन पुत्रांना तसेच तारुण्य, सौंदर्य व औदार्य अशा गुणांनी युक्त असलेल्या प्रसूती व आकूती अशा दोन कन्यांना जन्म दिला. त्यांपैकी प्रसूतीला (विवाहामध्ये) दक्षाला दिली व आकूतीला (विवाहामध्ये) रुची प्रजापतीला दिली.

६. त्या रुची प्रजापतीने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. त्या दोघांनी ‘दक्षिणा' नावाच्या मुलीला जन्म दिला. तसेच त्यांना ‘यज्ञ' नावाचा पुत्रही झाला. त्या दंपतीच्या मैथुनापासून पुढे प्रजेची वाढ होऊ लागली.

७. प्रसूतीपासून दक्षाला २४ कन्या झाल्या. त्यांची नावे आता क्रमशः ऐक.

८.-१२. श्रध्दा, लक्ष्मी, धृती, पुष्टी, तुष्टी, मेधा, क्रिया तसेच बुध्दी, लज्जा, वपु, शांती, सिध्दी, कीर्ती या दक्षिणेपासून झालेल्या या तेरा कन्यांचा भगवान धर्माने अपत्यप्राप्तीसाठी पत्नी म्हणून स्वीकार केला. हे उत्तम देवा, त्यांपैकी उरलेल्या सुलोचन व तरुण अशा-सती, ख्याती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा त्याचप्रमाणे सन्नती, अनसूया, ऊर्जा, स्वाहा आणि शेवटची स्वधा- या११ कन्यांचा भव, भृगू, मरीची, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, अत्री, वसिष्ठ, अग्री व पितर या प्रसिध्द व श्रेष्ठ ऋषींनी स्वीकार केला.

१३. श्रध्देने कामाला, लक्ष्मीने दर्पाला, धृतीने नियमाला, पुष्यीने संतोषाला, तुष्टीने क्षमेला जन्म दिला.

१४. सिध्दीने सुखाला, कीर्तीने यशाला जन्म दिला. ही सर्व धर्माची अपत्ये होत. कामाला नंदीपासून हर्ष नावाचा पुत्र झाला. त्यांपासून हिंसा या कन्येचा जन्म झाला.

१५. सर्वांना अपकारक असा अधर्म निर्माण झाला. हिंसेने अधर्माचे पत्नीत्व स्वीकारले व त्या दोघांना अनृत नावाचा पुत्र झाला.

१६. आणि त्याचप्रमाणे निकृती नावाची कन्या प्राप्त झाली. त्या दोघांनी भय व नरक नावाचे पुत्र, वेदना व माया या दोन कन्या यांना जन्म दिला.

१७. मायेने भयापासून सर्व भूतांचा संहार करणार्‍या मृत्यूला जन्म दिला. आणि त्यानंतर वेदनेने नरकापासून दुःखाला जन्म दिला.

१८. मृत्यूपासून व्याधी, जरा (वार्धक्य), शोक, तृष्णा आणि क्रोध हे सर्व निर्माण झाले. हे सर्व अधिक दुःखकारक मानले गेले आहेत. ही सर्व अधर्माची लक्षणे आहेत.

१९. यांना स्त्री व पुत्र कोणीही नव्हते. कारण ते सर्व नैष्ठिक ब्रह्मचारी होते. हे महामते, ही माझी रौद्र रूपे आहेत.

२०.-२२. जी नेहमी प्रलयास कारणीभूत होतात, असे मनीषी लोकांनी जाणावे. मरीची, अत्री, दक्ष व भृगू इत्यादी श्रेष्ठ प्रजापती या विश्वात महात्मे असून ते नित्य सर्गाचे कारण आहेत. मनू आणि त्यांचे पुत्र जे शासक आणि वीर्याने श्रीमंत सन्मार्गावर चालणारे तसेच शूर आहेत, ते नित्य स्थितीचे(अवस्थेचे) कारण आहेत. हे विभो, आपल्या इच्छेनुसार, ते सर्गाची स्थिती व विनाश करतात.

२३.- २४. हे पुत्रा, (त्या त्या उपायांनी ??) मी स्वेच्छेने बोकड इत्यादी रूपे धारण करतो. नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक, तसेच नित्य असा चार प्रकारचा प्रलय मानला गेला आहे. विश्वाचा पालनकर्ता ब्रह्मदेव जन्मतो, हा नैमित्तिक प्रलय मानला आहे.

२५. जेव्हा ब्रह्मांडाचा प्रकृतीत नाश होतो, तेव्हा तो प्राकृत लय होतो. ज्ञानामुळे, योग्यांचा परम तत्त्वामध्ये जो लय होतो, त्याला आत्यंतिक प्रलय म्हटले आहे.

२६. प्राणिमात्रांचा जो दिवसरात्र सदैव नाश होत असतो, त्याला नित्य प्रलय म्हणतात. प्रकृतीचे जे प्रसूत होणे, तिला प्राकृत सृष्टी मानले आहे.

२७. प्रलयानंतर, देवादिकांची जी सृष्टी म्हटली आहे, तिला नैमित्तिक सर्ग जाणावे. कारण या सृष्टीसाठी ब्रह्मदेव कारणीभूत असतो.

२८. हे उत्तम देवा, जिथे प्रतिदिन भूतांची निर्मिती होते, तिला पुराणांध्ये पारंगत असणारे विद्वान नित्य सर्ग म्हणतात.

२९. हे उत्तम देवा, ब्रह्मदेवाच्या चिंतनामुळे जो प्रकृतीचा विकार मानला गेला आहे, त्याला विद्वानांनी आत्यंतिक सर्ग असे म्हटले आहे.

३०. हे देवा, अशा प्रकारे, भूतांचा पालनकर्ता असा मी भगवान सदैव सर्व शरीरांध्ये उत्पत्ती, स्थिती व लय करत असतो.

३१. सर्व देहांध्ये उत्पत्ती स्थिती व नाशाच्या विष्णूच्या शक्ती परिवर्तित होत असतात. कारण विष्णू ही शिवाची शक्ती आहे.

३२. ही तीन प्रकारची ब्रह्मशक्ती त्रिगुणात्मिका मानली गेली आहे. कारण ब्रह्मदेव या त्रिगुणांच्या पार जातो. त्यापासून तो परत येत नाही.

३३. कुमाराने म्हटले- हे देवा, तत्त्वज्ञानी लोक आपल्याला अष्टमूर्ती असे म्हणतात. किंवा, या सर्वाध्ये हे प्रभो, तू आठ प्रकारची विविध रूपे धारण करतोस, अशी तुझी प्रशंसा करतात.

३४. शंकराने म्हटले- हे वत्सा, पूर्वी मी तुला ब्रह्मदेवाच्या तामस सृष्टीविषयी सांगितले. आता, हे पुत्रा, माझे आठ भेद यथार्थपणे ऐक.

३५. आधी परमात्म्याचा स्वतःसारखाच अच्युत हा पुत्र होता. प्रभूच्या मांडीपासून नीललोहित हा कुमार उत्पन्न झाला.

३६. तो अगोदर मंजुळ स्वरात रडे. नंतर पुन्हा पुन्हा मोठ्या स्वरात आक्रोश करे. ‘तू का रडतोस?' असे ब्रह्मदेवाने विचारले.

३७. त्याने त्या प्रजापतीला म्हटले, ‘मला नाव दे'. त्यावेळी प्रजापती म्हणाला, ‘तुझे नाव रुद्र आहे.'

३८. असे म्हणून, आणि त्यानंतर पुन्हा आदराने त्या भगवान विेष्णूने त्याला इतर आठ नावे दिली.

३९.ते ४२. त्या प्रभूने त्या आठ रुद्रांची, त्यांच्या पत्नींची आणि पुत्रांची नावे सांगितली. शर्व, भव, ईशान, पशुपती, भीम, उग्र तसेच महादेव ही आठ रुद्रांची नावे होत. पितामहाने म्हटले, ‘या माझ्या देवांची ही अनुक्रमे रहाण्याची स्थाने होत-अग्री, सूर्य, जल, भूी, वायू, आकाश, दीक्षित ब्राह्मण (तप?) आणि चंद्र. उषा, सुवर्चला, सुकेशी, पराशिवा, स्वाहा, दिशा, दीक्षा, रोहिणी ही अनुक्रमे त्यांच्या पत्नींची नावे.

४३. हे सुरश्रेष्ठा, आठ रुद्रांची नावे व त्यांची सूर्यादी स्थाने याविषयी तुला सांगितले. आता, हे महाभाग पुत्रा, त्या रुद्रांच्या पुत्रांची नावे ऐक.

४४.ते ४६. ज्यांच्या प्रकट आविष्कारामुळे सर्व जगत व्याप्त झाले ते पुत्र अनुक्रमे- शनैश्चर, शुक्र, लोहितांग, महाजव, स्कंद, सर्ग, संतान आणि बुध. अशा प्रकारे हा रुद्र आहे. त्या महात्म्याच्या दाक्षायणी या पत्नीने पित्याच्या कोपामुळे पूर्वी स्वत;च्या देहाचा त्याग केला. ती हिमालयाची कन्या होऊन पुढे महाव्रता अशी तुझी माता झाली.

४७. (मेना व हिमालयाची ही सर्वार्थाने परिपूर्ण अशी कन्या म्हणून जन्माला आली.) ?? पूर्व जन्मातील देहाचे स्मरण असणार्‍या त्या सतीने माझ्याशी विवाह केला.

अध्याय १ ते २०