अध्याय ३ - शिवेन सृष्टिक्रमकथनम्
१. शंकराने म्हटले- पुत्रा, जसे घडले, ते मी संक्षेपाने सांगत असताना ऐक. तुला जे ऐकण्याजोगे आहे, तेच सांगितले. अयोग्य व्यक्तीला हे सांगू नये.
२. हे पुत्रा, चराचर भुवने जलामध्ये विलीन केल्यावर, शेवटी मी एकटा उरलो आहे. तमोगुणाने युक्त असा मी विश्वाचा संहार करून जलात्मक होऊन राहिलो आहे.
३. सिध्द लोक हे माझे दिव्य जलस्वरूप सदैव निर्मल, निष्कलंक आहे असे म्हणतात. काहीजण आत्मा हा नित्य, अनिर्वचनीय व निरपेक्ष आहे असे म्हणतात, तर काही जण आत्मा हा एकमेव व श्रेष्ठ आहे असे म्हणतात.
४. त्यानंतर, हळुहळू, क्रमाक्रमाने अचल, जलात्मा असा मी चैतन्याने वस्तुतः परिपूर्ण असूनही, स्वत;ला आकुंचित करून आणि सत्त्वात्मक गुणाला पुरस्कृत करून या जगतात नारायण म्हणून प्रसिध्द होतो.
५. तेव्हा सत्त्वगुणाचा प्रादुर्भाव झाला. रजोगुण ब्रह्माच्या नावाने प्रकट झाला आणि नंतर, मी रुद्रत्व धारण करून, रौद्र गुणाचा प्रमुख भाव असलेल्या तामस गुणाने (विश्वाचा) संहार करतो.
६. स्कंदाने म्हटले- हे तात, जगात सत्त्व, रजस् व तमस् या गुणांचे काय प्रयोजन आहे, हे ऐकण्याची माझी इच्छा आहे.
७. शंकराने म्हटले- मी सत्त्वगुणाने वेद जाणणार्या सर्व देवांची निर्मिती करतो. तर तामस गुणाने मी मूढ असुर, पर्वतादी स्थावर व पशुयोनीतील प्राण्यांना निर्माण करतो.
८. राजस गुणाच्या आधिपत्याखाली बाकी शिल्लक राहिलेल्यांची निर्मिती करतो. अशातर्हेने, तीन प्रकारची निर्मिती करतो. गुणांच्या या विभागणीनुसार, मी ब्रह्मा, विष्णू, शिव या संज्ञांनी प्रख्यात आहे.
९.१०. कुमाराने म्हटले- हे देवेश पुरुषोत्तम, तुम्ही एकटेच सर्व प्राणिमात्रांध्ये साक्षिरूपाने (देहातील चैतन्यरूपाने) अस्तित्वात असताना, नानात्वाचे व एकत्वाचे प्रयोजन काय, हे आपण विशद करून सांगावे. शंकराने म्हटले- हे पुत्रा, विकारशील सृष्टीचे परम रहस्य ऐक.
११. फार पूर्वी सात्त्विक गुणयुक्त असा मी जलमय होतो. (जल हेच माझे विश्व होते.) हे कमलाक्षी पुत्रा, काही काळाने माझ्यात क्षोभ (कामविकार) निर्माण झाला.
१२. त्या क्षोभातून चतुर्भुज असे दिव्य रूप निर्माण झाले. सत्त्वगुणाने युक्त असे ते श्रेष्ठ रूप विष्णू या नावाने प्रसिध्द झाले.
१३.-१४. सर्व प्राणिमात्रांध्ये व्यापून राहिल्याने मी विष्णुत्वाला गेलो.(मी सर्वव्यापी झालो.) अच्युत, अनंत, गोविंद, विष्णू, नारायण इत्यादी नावांनी सर्व लोकांत तसेच सर्व पुराणांत सर्व प्रकारे त्या रूपाचे वर्णन केले आहे. तो विकारशील आहे असे जाणावे, ज्याप्रमाणे दही नवनीतात (लोण्यात) विकारित होते.
१५. हा आदिदेव सनातन असून माझी शक्ती म्हणून प्रसिध्द आहे. याला आदी (आरंभ) नाही व अंतही नाही. तसेच हा सर्वांचा मध्य असून सर्वांच्या मध्ये राहणारा आहे.
१६. तोच अनंग, अंतक आणि जगाचा स्वामी आहे. हे पुत्रा, तोच कर्ता, करविता व संहारकर्ता होय.
१७. हा पद्माक्ष विष्णू आपल्याच मायेने आत्मरूपातच झोपी जातो. शयनावस्थेत असताना त्याच्या कुशीतून अत्यंत सुंदर असे कमळ निर्माण झाले.
१८. तेच कमळ विकसित होऊन त्यातून ब्रह्मदेव उत्पन्न झाला. त्यामुळे त्याला पद्मयोनी, पद्मगर्भ, स्वयंभू व प्रपितामह असे म्हणतात.
१९. हे वीरा, हा अव्यक्त असून सृष्टीचा जनक आहे. तोच विरिंची व प्रजापती होय. हा चतमुर्ख असून चतुमूर्ती आणि चतुर्वेदभूषित आहे.
२०. निरालंब व जलात्मक अशा विश्वाचे निरीक्षण करून विश्वात्मा ब्रह्मदेव ‘मी काय करावे?' या चिंतेत पडला.
२१.-२२. तेव्हा ‘ब्रह्मा, ब्रह्मन्' असा स्पष्ट व मोठा आवाज आला. ‘भगवन्, सृष्टी निर्माण कर. चिंता करू नकोस.' असे म्हणून आकाशवाणी अंतर्धान पावली. ती ऐकून प्रपितामह ‘मी प्रजा कशी निर्माण करू?' अशी पुन्हा चिंता करू लागला.
२३.-२५. तेव्हा त्या महात्म्याला प्रचंड राग आला. खवळलेल्या त्या महात्म्याच्या भालप्रदेशातून तामस गुणयुक्त, अंगुष्ठमात्र असा रुद्र नावाचा पुरुष निर्माण झाला. तो बालक सुस्वरात रडू लागला. ब्रह्मदेवाने निर्माण झालेल्या त्या बालकाला म्हटले,’हे निष्पाप बालका, स्वतःचे विभाजन कर.' (असे ऐकूनही) तो बालक पुन्हा पुन्हा रडू लागला. नंतर त्या बालकाने स्वतःला एका प्रकारात तसेच दहा प्रकारांत विभाजित केले.
२६. हे सुव्रता, सर्व भक्तांचा, सर्व देवांचा स्वामी भगवान शंकर हा अकरावा भाग होय.
२७.-२८. साक्षात ब्रह्मदेवाने त्या वरद, लोकगुरू अशा रुद्राला म्हटले, ‘स्वेदज, अंडज, जरायुज व उद्भिज्ज या चार प्रकारच्या भूतमात्रांची सृष्टी निर्माण कर. तू स्थिर व सनातन आहेस.' असे ब्रह्मदेवाने म्हटले असता तो रुद्र पाण्यात विलीन झाला.
२९. -३०. नंतर, सृष्टी निर्माण करण्याची इच्छा असलेल्या त्या पद्मयोनी ब्रह्मदेवाची चिंता अधिकच वाढली. त्यानंतर, अशाप्रकारे चिंताग्रस्त झालेल्या त्या महात्मा, विरिंची, पद्मयोनी अशा ब्रह्मदेवाच्या मनापासून सनत्कुमार आदी सिध्द, योगाधिकारी असे प्रमुख दहा पुत्र निर्माण झाले.
३१. त्यांना भगवान ब्रह्मदेवाने म्हटले, ‘हे पुत्रांनो, माझ्या आदेशानुसार तुम्ही सृष्टी निर्माण करा. तुम्ही निःसंशय तुचे कर्तव्य कराल.'
३२.-३३. ते ब्रह्मदेवाला म्हणाले, ‘आम्ही सिध्द असूनही निरपेक्ष आहोत. त्यामुळे, तुच्या इच्छेप्रमाणे, आम्ही सृष्टी निर्माण करण्यास असमर्थ आहोत.' असे म्हणून, सर्वजण पद्मयोनीची इच्छा नसतानाही अंतर्धान पावले. त्यानंतर, अमेयात्मा ब्रह्मदेव पुन्हा दीर्घकाळ ध्यानस्थ झाला.
३४.-३५. अशाप्रकारे दीर्घकाळ ध्यान करणार्या त्याच्या उजव्या अंगठ्यातून धर्मात्मा दक्ष निर्माण झाला आणि पुन्हा त्याच्या डाव्या अंगठ्यापासून महाभाग्यवान, कमललोचना अशी त्याची पत्नी निर्माण झाली. लोकपावन भगवंताने त्यांचा विवाह करून दिला.
३६. तिला त्याच्यापासून (दक्षापासून) साठ सुंदर मुली झाल्या. पुढे त्यांच्या परस्पर प्रसूतीवर्धनाने त्रैलोक्य वाढत गेले.
३७. कुमाराने म्हटले- ‘स्वयंभुवाने निर्माण केलेल्या सृष्टीविषयी तसेच, दक्षकन्या विवाहामध्ये ज्यांना दिल्या, त्यांच्याविषयी तुम्ही पुन्हा सांगावे.'
३८. शंकराने म्हटले- बाबा रे, ब्रह्मदेवाच्या प्रधानापासून (प्रकृतीपासून) महत् तत्त्व निर्माण झाले. प्रधान तत्त्वाने महत् तत्त्व झाकलेले असते, जसे त्वचेने बीज !
३९. महत् तत्त्वापासून वैकारिक (राजस), तैजस (सात्त्विक) व भूतादी तामस असा त्रिविध प्रकारचा अहंकार निर्माण झाला.
४०. तो त्रिगुणात्मा भूतेंद्रियांचा हेतू असतो. ज्याप्रमाणे प्रधान तत्त्वाने महत्, त्याप्रमाणे महत् तत्त्वाने तो आवृत असतो.
४१. भूतादी विकार निर्माण करणार्या त्याने शब्दतन्मात्रेचे रूप धारण केले आणि शब्द हे लक्षण असलेले आकाश त्याने शब्द तन्मात्रातून निर्माण केले.
४२. नंतर, भूतादी त्रिगुणात्म्याने शब्द हे लक्षण असलेल्या त्या आकाशाला आवृत केले. नंतर त्याच्यातील तन्मात्र तत्त्वामुळे त्याला तन्मात्रा असे म्हणू लागले.
४३. त्यानंतर वायू निर्माण झाला. त्याचा स्पर्श हा गुण मानला गेला. त्यानंतर वायू हा विकार निर्माण करणार्या त्या त्रिगुणात्म्याने रूप हा गुण निर्माण केला.
४४. वायूपासून तेज निर्माण होते. त्याचा रूप हा गुण म्हटला जातो. स्पर्श हे लक्षण असणारा वायू रूप गुणाला आवृत करतो.
४५. तेजाला सुध्दा विकृत करणार्या त्या त्रिगुणात्म्याने रस या गुणाला निर्माण केले. जल हे रस गुणयुक्त असते. ते रसाला आधार देते.
४६. जलाला विकृत करणार्या त्याने गंध हा गुण निर्माण केला. त्याच्यापासून पृथ्वी निर्माण होते. म्हणून तिाचा गंध हा गुण मानला गेला आहे.
४७. तन्मात्राने ही भूते वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्या त्या विशेषापासून ती निर्माण झालेली आहेत. तामस अहंकारापासून हा भूततन्मात्र सर्ग निर्माण होतो.
४८. हे पुत्रा, तैजस म्हणजेच सात्त्विक अहंकारापासून दहा इंद्रिये व त्यांच्या अधिष्ठात्री देवता व अकरावे मन यांविषयी हे पुत्रा ऐक.
४९. त्वचा, डोळे, नाक, जिह्वा व पाचवे कान ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे त्यांचे अनुक्रमे विषय होत.
५०. गुदद्वार, जननेद्रिंय, दोन हात, दोन पाय व पाचवी वाणी ही कर्मेंद्रिये होत. उत्सर्जन, उत्पत्ती, गती, बोलणे व क्रिया हे त्यांचे विषय सांगितले आहेत.