अध्याय ०२ - षडाननेन शिवं प्रति पृष्टः सृष्टिप्रश्नः

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय २ - षडाननेन शिवं प्रति पृष्टः सृष्टिप्रश्नः

१.-२.-३. नारद म्हणाले- प्रिया पार्वतीसमवेत, तसेच नंदी प्रमुखादी सिध्दांसमवेत, सेवा करत असलेल्या गणांसमवेत, तसेच देवांसह रम्य अशा कैलास शिखरावर बसलेल्या, विश्वाच्या गर्भाला धारण करणार्‍या, शाश्वत ज्ञान ज्ञात झालेल्या शंकराच्या जवळ जाऊन मोठ्या भक्तिभावाने षण्मुखाने (कार्तिकेयाने) आपल्या पित्याला वंदन केले आणि मातेला अभिवादन करून तिच्याजवळ बसला.

४. महादेवाने स्मितपूर्वक त्याला म्हटले, ‘पुत्रा, या जगताचा मी आता संहार करणार आहे.

५.-६. तेव्हा तू येथे राहू नयेस. सिध्दिदायक अशा गोकर्णक्षेत्री त्वरित जा. तीन रात्रींच्या आतच हे सर्व स्थावर-जंगम विश्व विलयाला जाईल. तेव्हा, तू तात्काळ उगमतीर्थ असलेल्या व माझे क्षेत्र असलेल्या गोकर्णाला जा.

७. मी सांगितलेल्या पध्दतीने राहून तू सिध्दी प्राप्त करशील.' कुमार म्हणाला, ‘हे देवदेवेश, हा संहार तुम्ही कशासाठी करत आहात ?

८. कशासाठी सृष्टी निर्माण करणार आहात ? सृष्टीमध्ये तुम्ही कसे राहता? हे भूतनाथ, प्राणिमात्रांची निर्मिती करून त्या सृष्टीचा असा संहार करणे आपणास प्रशस्त नाही.

९. हे शंकरा, सर्व प्राणिमात्रांच्या बाबतीत तुम्हाला प्रेम आहे की द्वेष आहे की समभाव आहे ते सांगा.

१०. हे शिवा, तुम्ही सर्वत्र हे काय करून ठेवले आहे? सिध्दिक्षेत्र असलेल्या गोकर्णाचा महिमा तुम्ही मला सांगावा.

११. ते सर्व ऐकून, मी मोठ्या आनंदाने गोकर्णक्षेत्री जाईन.' शंकराने म्हटले, ‘पुत्रा ऐक. श्रेष्ठ असे रहस्य मी तुला सांगतो.

१२. मीच हे सर्व विश्व आहे. दुसरे कोणीही नाही. आदी, मध्य व अंत निःसंशय मीच आहे.

१३. मला आरंभ नाही, मध्य नाही, तसाच अंतही नाही. आदी, मध्य व अंत मीच निर्माण केले आहेत, हे तू जाण.

१४. प्रथम मी सृष्टी निर्माण करतो, हे वत्सा, मीच तिचे रक्षण करतो आणि या दृश्य अदृश्याचा अंतही मीच करतो.

१५. सत्त्व, रज, तम हे त्रिगुण माझ्या देहातूनच निर्माण झाले आहेत आणि (त्यामुळे) हे जगत सात्त्विक, राजस व तामस या गुणांनी युक्त आहे.

१६. त्या त्रिगुण-स्वभावानुसार, लोक त्रिविध सिध्दींची इच्छा करतात.' कुमार कार्तिकेयाने म्हटले,’हे देवेश, या सृष्टीविषयी मी ऐकू इच्छितो.

१७. त्याचप्रमाणे, हे प्रभो, त्रिविध सिध्दी आणि सिध्दीक्षेत्रांविषयी ऐकण्याची माझी इच्छा आहे.' शंकराने म्हटले, ‘हे सुरश्रेष्ठा, सर्व प्राणिमात्रांचा मीच प्रारंभ, मध्य व अंत आहे.

१८. सर्व भूतांचा निःसंशयपणे मी आत्मा आहे. मला प्रेम नाही, तसेच द्वेषही नाही. सर्वांच्या ठिकाणी मी समभावाने राहतो.

१९. हे सुव्रता, त्रिगुणांच्या विभागणीने मी सृष्टी निर्माण करतो. हे पुत्रा, सृष्टीची लक्षणे आता मी विशद करून सांगतो. ऐक.

२०. मी अक्षय, अजेय आहे. मीच आत्मा आहे. मी अच्युत आहे, अनंत आहे. कार्तिकेया, मला कोणीही जाणत नाही.

२१. पुत्रा, ज्ञानप्रेरित लोक माझीच विविध प्रकारे आराधना करतात. तरीही मला (यथार्थपणे) जाणत नाहीत. माझ्याविना (या जगात) काही नाही.

२२. अरूप, अदेह, अनंग असल्यामुळे, मी अगोचर (दृष्टीला न दिसणारा) आहे. शब्दाने मी दिसत नाही. योग्यांना साध्य असा मी अच्युत आहे.

२३. मी ध्वनियुक्त आहे व ध्वनिरहितही आहे. निर्गुण आहे, तसेच गुणात्मकही आहे. हे पुत्रा, अनेक प्रकारे, हे तुला मी सांगितले आहे. पण हे सर्व तुला समजले नसेल.

२४. सर्व प्राणिमात्रांच्या देहामधील आत्मा मी आहे. ‘क्षेत्रज्ञ' या संज्ञेने मला ओळखतात. हे त्रैलोक्य माझ्या अधीन आहे. माझ्या क्रियेने ते परिवर्तित होते.

२५. मला काही प्रिय नाही. काहीही द्वेष करण्याजोगे नाही. तसेच मी उदासीनही नाही. हे चराचर विश्व माझ्यातून निर्माण होते. माझ्यात स्थित होते.

२६. आणि शेवटी, माझ्यातच पुन्हा विलीन होते. माझ्या मायेने, सर्व चराचर सृष्टी शेवटी माझ्याकडेच येते. या जगताचा प्रारंभ शिव आहे, तसेच मध्यही शिव आणि अंतही शिव होय. संपूर्ण विश्व अंतर्बाह्य शिव आहे.

अध्याय १ ते २०