अध्याय ०१ - गोकर्णक्षेत्रवर्णनप्रारंभः

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय १ - गोकर्णक्षेत्रवर्णनप्रारंभः

॥श्री॥

श्रीगणेशाय नमः। श्रीमहाबलेश्वराय नमः।

सर्व विघ्नांचे अधिदैवत असलेल्या विघ्नेश्वर देवाला मी नमस्कार करतो. संकट निवृत्तीसाठी मी त्या गजाननाला प्रणाम करतो. गोकर्णक्षेत्र हे निवासस्थान असलेल्या, सज्जनांना वर देणार्‍या तसेच सर्व कार्याच्या सिध्दीसाठी, द्विभुज अशा त्या (वरद द्विभुज गणपती, जो महाबलेश्वर मंदिराच्या आधी स्थित आहे) गजाननाला नमस्कार. आता सुरवरांनी स्तुती केलेला, भवानीपती, उंच पर्वतांच्या उन्नत शिखरांवरून वेगाने वाहणार्‍या गंगाप्रवाहाला जटांमध्ये सामावून घेणार्‍या तसेच मस्तकावर चंद्र धारण करणार्‍या, तसेच दुसरा कैलासच अशा गोकर्णक्षेत्री सदैव वास करणारा हा महाबल (भगवान्‌ शिव) आपल्या सर्वांचे रक्षण करो. त्रिवर्गांना (ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य) श्रेयस्कर व अत्यंत पवित्र अशा गोकर्णखण्डाचे आपण वर्णन ऐकावे.

कुरुंच्यावंशात जन्माला आलेला महाबुध्दिमान्‌ व अत्यंत धार्मिक असा शतानीक नावाचा राजा होऊन गेला. तो शौनकादि ऋषीमुनींच्या सहवासात सदैव, निःशंकपणे राहत असे. वैराग्य ज्ञानात अत्यंत निपुण, प्रपंचात उदास, आत्मसाधनेत मग्न, असा तो अत्यंत भक्तीपूर्वक राही. असेच एकदा, पुराणांचा अर्थ जाणणारे, धर्मात्मा, व्यासशिष्य सूत तीर्थयात्रेसाठी भ्रमण करत असता तेथे आले. उग्रश्रवाने (सूत) शतानीकाला शुभाशीर्वाद देऊन, शौनकादि मुनींना वंदन करून, स्वाध्याय तपाचरण वगैरेंचे कुशल विचारले. तेव्हा युधिष्ठिराच्या कुळात जन्मलेला तो धर्मात्मा (शतानीक) राजा महाप्राज्ञ ज्ञानवैराग्ययुक्त अशा सूताला "आसनस्थ व्हावे" असे आदरपूर्वक म्हणाला आणि नंतर त्या भारताने (भरतवंशीय-राजा शतानीक) सूताला आसन दिले. नंतर आदरातिथ्य झाल्यावर ऋषीमुनींच्या अनुज्ञेने सूत त्या सभेत आसनस्थ झाला. काही काळसूताने विश्रांती घेतल्यावर, सभेमध्ये शौनक मुनींनी सूताला विचारले, "हे तात सूता, सांप्रत आपण कोठून आलात, कुठे चालला आहात, कोणत्या हेतूने येथे आलात?"

सूत म्हणाले, "हे ब्रह्मन्‌, (शौनकाला उद्देशून) तीर्थयात्रा करण्यासाठी तसेच प्रपंच त्यागाला उत्सुक व उद्युक्त असलेल्या शतानीकाला भेटण्यासाठी मी आलो आहे. गोकर्णक्षेत्री श्रेष्ठ अशा ब्राह्मणांसमवेत बराच काळ राहून या ठिकाणी आलो आहे. आता तुमच्या मनात मी काय करावे असे आहे ते मला सांगावे."

शौनक म्हणाले, "तीर्थक्षेत्राच्या दर्शनाने, तेथील तीर्थात स्नान केल्याने तसेच दान दिल्याने जे फळ मिळते, तसेच जप, उपवास, होमहवन, तीर्थाच्या ठिकाणी पूजा केल्याने कोणते फळ मिळते, तीर्थांची उत्पत्ती कशी झाली, त्याने मिळणारे पुण्य व पाप या सर्वाविषयी आम्हा सर्वाना फार कुतूहल आहे. तेव्हा हे सर्व तू आम्हाला सांगावे. मागे काय घडले, आता काय घडते आहे व पुढे काय घडणार आहे हे सर्व तुला ज्ञात आहे. दुसर्‍या कोणालाही ते ज्ञात नाही."

शौनकांनी हे विचारल्यावर सभेमध्ये राजा शतानीकाने सूत मुनींना विचारले, "मी गोकर्णाहून आलो आहे असे तुम्ही म्हणालात. पण हे गोकर्णक्षेत्र कोणत्या प्रदेशात आहे, आपण तेथे का बरे राहिलात, तेथे वास्तव्य करत असता आपल्यासमवेत कोण कोण होते, त्यामध्ये प्रसिध्द कोण होते, त्याविषयी, हे सूत, विस्ताराने तसेच क्रमशः आम्हाला सांगावे."

सूत म्हणाले, "हे मुनिश्रेष्ठांनो, हे राजा, ऐका. व्यासांच्या कृपेने मी जे प्रत्यक्ष पाहिले ते तुम्हाला वर्णन करून सांगतो. हे नृपश्रेष्ठा, सिध्दीक्षेत्रे तीन आहेत. चतुर्विधपुरुषार्थदायक (धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ - त्यांची सिध्दी होणारे) अशी त्यांची रहस्ये पवित्र आहेत. सर्व देवगण त्या स्थानांशी सदैव वास करतात. शालग्राम (शाळीग्राम) नावाचे गंडिका, पुष्कर आणि गोकर्ण ही तीन क्षेत्रे होत. सत्व, रज आणि तम या विख्यात त्रिगुणांनी ही क्षेत्रे युक्त आहेत. अनुक्रमे ब्रह्मा, विष्णु आणि रुद्र (शिव) या त्या क्षेत्रांच्या तीन अधिदेवता. या देवता या क्षेत्री निरंतर वास करतात. ऋग्वेद, यजुर्वेद तसेच सामवेद ह्या त्रिविध वेदांनी युक्त हे पूर्ण जगत्‌ या तिघांच्या ठायी स्थित आहे. हे राजा, पहिले क्षेत्र ब्रह्माचे असून दुसरे विष्णूचे व तिसरे शिवाचे होय. ही तीन क्षेत्रे आणि अठरा पुराणे ही महासिध्दी प्राप्त करण्याची द्वारे होत, ती मी तुला सांगतो. हे राजा, तू ते एकाग्रतेने जाणून घे. सर्व पुराणांमध्ये पहिले पुराण म्हणजे ब्रह्मपुराण होय. मग पद्म, विष्णु, शिव, भागवत, तसेच सहावे म्हणजे नारद, सातवे मार्कंडेय, आठवे अग्नि, नववे भविष्य, दहावे ब्रह्मवैवर्त, अकरावे लिंग, बारावे वराह, स्कंदपुराण तेरावे, चौदावे वामन, कूर्मपुराण पंधरावे होय. मत्स्य, गरुड व ब्रह्मांड ही नंतरची तीन मिळून अठरा पुराणे मी तुला सांगितली. आता पुराणांचे लक्षण सांगतो. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वन्तर आणि निरनिराळ्या वंशांची चरित्रे ही पुराणांची पाच लक्षणे होत. वरील सर्व पुराणांमध्ये ही पाच लक्षणे दिसून येतात. त्यातील सहा वैष्णव (विष्णुसंबंधी) सात्विक गुणांची पुराणे आहेत, सहा ब्रह्म्‌याची राजसगुणयुक्त व बाकी सहा, हे राजा, शिवमय असून तामस गुणांनी युक्त आहेत."

शतानीक म्हणाला, "हे महामती सूता, आता तू सिध्दीक्षेत्राविषयी म्हणालास. सिध्दी म्हणजे काय, किंवा सिध्द कोण, सिध्दाचे लक्षण काय, त्याचे प्रयोजन कोणते, या सिध्दीक्षेत्रांमध्ये ज्यांनी सिध्दी प्राप्त केली या सर्वांविषयी आम्हाला सांग."

सूत म्हणाले, "त्रेता युगात संवर्तक नावाचा महातेजस्वी असा अग्निपुत्र महान्‌ अशा गोकर्णक्षेत्री दीर्घकाळ राहिला होता. निर्द्वंद्व, निरहंकारी होऊन श्रेष्ठ सिध्दीची इच्छा करणारा तो तेथे घोर तपश्चर्या करत होता. असेच एकदा सर्वत्र भ्रमण करणारे, समदर्शी नारद नावाचे मुनी योगायोगाने तेथे आले. श्रेष्ठ अशा नारदमुनींना आलेले पाहून अग्निपुत्र संवर्तकाने उठून त्यांना अर्घ्य देऊन शिरसाष्टांग नमस्कार केला आणि त्यांना आसन दिले. भगवान्‌ नारदांनी योग्यांचा ईश्वर, स्वामी असलेल्या महात्मा संवर्तकाला त्याचे कुशल विचारले आणि त्याला बस असे म्हटले. संवर्तकही नारदांच्या अनुज्ञेने आसनावर बसला. यानंतर विश्रांती घेऊन झालेल्या नारदांना संवर्तकाने म्हटले, हे मुनिश्रेष्ठा, आज माझा जन्म सफल झाला, मी कृतार्थ झालो. आपल्या दर्शनाने हे महामते, मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. आपल्या दर्शनाची तपस्वी मुनीजन व देवही इच्छा बाळगतात, म्हणून आपल्या भेटीने अपुण्य संभवणारच नाही (आपले दर्शन पुण्यकारकच राहील) तुमच्या दर्शनामुळे माझी तपस्या फलद्रुप होईल असे मला वाटते, कारण आपल्यासारख्यांचा सहवास कर्मक्षय करणारा असतो."

सूत म्हणाले, "अशाप्रकारे संवर्तकाने नारदांचा यथोचित सन्मान केल्यावर प्रसन्न झालेले नारद पुन्हा संवर्तकाला म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, तुझ्या तपश्चर्येने, संयमाने, परमश्रेष्ठ देवदेवेश रुद्राच्या भक्तीने तसेच या क्षेत्राच्या प्रभावाने व गुरुशुश्रूषेने तू सिध्द झाला आहेस. तेव्हा हे ब्राह्मणश्रेष्ठा, तुझ्या मनात काय आहे ते माग, मी ते देईन. माझे दर्शन व सिध्दी अमोघ आहे. त्रैलोक्याचे ऐश्वर्यही मागितलेस तरी मी तुला देऊ शकतो."

संवर्तक म्हणाला, "हे मुने, आपल्या दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे यात संशय नाही, तरीही हे ब्रह्मन्‌, माझ्या मनात बराच काळ काही प्रश्न आहेत ते मी आज तुम्हाला विचारतो, त्याच्याविषयी तुम्ही मला सांगावे. या श्रेष्ठ क्षेत्री किती सिध्द ब्राह्मण वास करतात, त्यांनी कोणत्या सिध्दी प्राप्त केल्या ते मला सांगा. या क्षेत्राचे गोकर्ण हे जे नाव विख्यात आहे ते कसे हे मला सांगा. येथे कोणत्या मुनींनी कशाप्रकारे सिध्दी प्राप्त केली ते सांगा."

नारद म्हणाले, "शिवलोकात शंभूमहादेवाने कुमार स्कंदाला सांगितले ते मी आज तुला त्या शिवाला प्रणाम करून सांगतो. ब्रह्माविष्णुस्वरुप अशा, भक्तांवर सदैव अनुकंपा असणार्‍या अशा या शंकराला नमस्कार. ज्याच्यामुळे हे विश्व उत्पन्न होते, ज्याच्यामुळे हे स्थित व शेवटी ज्याच्यामध्ये हे विश्व विलीन होते त्या लिंगमूर्तीला नमस्कार."

अध्याय १ ते २०