अध्याय ८१ ते १२०

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय ८१ - मणिभद्र, सिध्देश्वर भूतनाथ महिमानुवर्णनम्‌

शतानीक म्हणाले,"हे मुने, सिध्दाश्रम आश्रमाचे माहात्म्य ऐकण्याची माझी इच्छा आहे. सिध्द कोण आहे, भूतनाथानेगोकर्णावर कशी सिध्दी प्राप्त केली, हे सर्व काही मला विस्ताराने सांगा."

सूत म्हणाले, ऐक, सिध्दाचे थोर चरित्र मी सांगतो. सर्व पापांचा नाश करणारे, सर्वांच्या इच्छापूर्ती करणारे असे त्याचे चरित्र ऐक. फार पूर्वी कैलासावर वृषभध्वज शंकर, पार्वती, वीरभद्रादी आपल्या गणांसमवेत बसले होते. सर्वजण पापनाशक असे गोकर्णक्षेत्राचे माहात्म्य ऐकत होते. गोकर्णाचे वैभव ऐकून सिध्द, मणिभद्र, भूतनाथ या शिवगणांनी शिवाला भक्तीपूर्वक हात जोडून नमस्कार केला आणि त्याची प्रशंसा करून ते म्हणाले,"हे देवदेवेशा, सर्व लोकांची गती तू आहेस, हे कृपासिन्धो, सर्वसृष्टीस्थित्यंतराचा तू कारक आहेस. तुझ्या मुखातून गोकर्णाचे वैभव ऐकले. तेव्हा ते क्षेत्र पाहण्याची आमची इच्छा आहे. आपण आम्हाला परवानगी द्यावी. तेथील तीर्थांमध्ये स्नान करून, महाबलेश्वराची पूजाअर्चा करून आपल्याकडे परतयेऊ."

त्यांचे हे बोलणे ऐकून महादेव गणांना म्हणाले,"माझ्या क्षेत्री जाऊन आस्वाद घेण्याची अशाप्रकारची बुध्दी तुम्हाला झाली आहे, तुम्ही धन्य झालात. तेव्हा मुलांनो, तुम्ही आजच जा. माझ्या आज्ञेनुसार तेथे जाऊन महाबलाची पूजा करून पुन्हा ताबडतोब परत या." शंभूमहादेवाचे ते बोलणे ऐकून मणिभद्र, भूतनाथ व सिध्द हे प्रमथ शिवाज्ञेने गोकर्णावर आले. तेथील तीर्थांमध्ये स्नान करून विधीवत्‌ महाबलाची पूजा केली. कोटितीर्थ, समुद्र व ताम्रगौरी नदी तसेच सर्व तीर्थे, देव, सिध्दऋषी, कामाघनाशिनी, पञ्चक्रोश इ. शिवात्मक गोकर्ण क्षेत्राविषयी कैलासापेक्षा अधिक जाणून ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. अर्धा योजन विस्तार असलेल्या क्षेत्रातून परत जाऊ शकले नाहीत व तेथेच राहिले. शतशृड्‌गाच्या रम्य तटावर व समुद्राच्या जवळ आश्रम बनवून मणिभद्र राहू लागला. त्यापासून पूर्वेला अर्धा कोस अंतरावरसिध्दाने आश्रम तयार केला व तो तप आचरू लागला. भूतनाथाने कोटितीर्थाच्या उत्तरेला, विश्वकर्म्याच्या आश्रमापासून पूर्वेला पवित्र आश्रम निर्माण केला व विश्वेश्वराचे ध्यान करत दीर्घकाल तपश्चर्या केली. हे राजा, दिव्यसहस्रवर्षे त्यांनी तप आचरले. सहस्रवर्षे जितेन्द्रिय व जितक्रोध होऊन निराहार राहून, पाय वर करून व डोके जमिनीला स्पर्श करत तप केले (शीर्षासन). मणिभद्रानेही सनातन अशा ब्रह्माचे ध्यान करीत तपश्चर्या केली. अशाप्रकारे तो तपश्चर्या करत असता ईश्वर प्रसन्न झाले. स्वतःला प्रकट करत प्रसन्नपणे त्याला (मणिभद्राला) म्हणाले,"हे मणिभद्रा, तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. तुझ्या मनात जे आहे ते सांग, वर माग." मणिभद्र म्हणाला,"तुझ्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो. तुझे दर्शन हाच माझ्यासाठी वर आहे. तुझ्या या सुंदर क्षेत्रामध्ये माझी राहण्याची इच्छा आहे."

ईश्वर म्हणाला,"मणिभद्रा, तू या क्षेत्रातसर्वकाळ वास्तव्य कर. या क्षेत्राच्या पश्चिमेला, दुष्टांचा नाश करणार्‍या समस्त भूतगणांचा तू अधिप हो. येथे येऊन जे लोक तुला शास्त्रानुसार पूजतील त्यांचे भूतपिशाचांमुळे असलेले पाप नष्ट होईल." अशा प्रकारे महादेवाकडून वर मिळवलेला मणिभद्र त्या शतशृङ्‌गाच्या माथ्यावर दुष्टांना शासन देत व त्या परिसराचे रक्षण करत तेथेच वास्तव्य करून राहिला. सिध्दानेही, हे राजा, तेथे आपल्या आश्रमात लिंगाची स्थापना करून, निर्मल असे तीर्थ बनवून , त्या तीर्थात रोज स्नान करून तसेच त्या लिंगाची रोज पूजा करत, तसेच वायुभक्षणाने निराहार राहून, क्रोध जिंकून तसेच जितेन्द्रिय होऊन बाहू उंचावून अंगठयाने भूमीला स्पर्श करत तपश्चर्या करत राहिला. अनेक वर्षांनी त्याच्या तपाने प्रसन्न होऊन पार्वतीपती सदाशिव त्याच्या पुढयात प्रकट झाला. त्याच्या दर्शनाने सिध्द हात जोडून त्याचे स्तवन करू लागला.

नमस्तेदेवदेवेशनमस्तेत्रिपुरान्तक॥
नमो भक्तानुकम्पाय नमस्ते गिरिजापते॥ नमस्ते वेदवेद्याय नमोवेदान्तरूपिणे ॥
नमस्त्रिशूल हस्ताय नमस्ते वृषवाहन ॥ इतिस्तु वन्महादेवं भूयोभूयोननाम च ॥

शंभू आनंदाने "इच्छित वर माग " असे त्याला म्हणाला. तेव्हा सिध्द त्याला म्हणाला," आपले दर्शन हेच माझे ईप्सित होय. तुझ्या या क्षेत्राविषयी ऐकून तुझी सेवा करण्याची माझी इच्छा आहे. माझे अन्य काही मागणे नाही." शंकर म्हणाले,"तथास्तु, माझ्या कृपेने तू सदैव येथेच वास कर. तुझ्या या गणांसह माझ्या या क्षेत्राचे पालन कर. हे महाभाग, पूर्वद्वाराशी तू निरंतर रहा. हे तीर्थ त्रैलोक्यात प्रसिध्द होईल. सिध्दकुण्ड या नावाने हे तीर्थ सर्व लोकांना सिध्दीदायक होईल. श्रावणातील शुक्ल पक्षात दशमीला जे उत्तम लोक तुझ्यासाठी या तीर्थात स्नान करून तू स्थापन केलेल्या लिंगाची पूजा करतील, ते खात्रीने ऐश्वर्यादी सिध्दी प्राप्तकरतील." असे म्हणून भगवान्‌ शंकर, पार्वती व गणांसमवेत तेथेच सिध्दाच्या पुढयात त्या लिंगात अंतर्धान पावले.

अशा प्रकारे वर प्राप्त करून सिध्द आपल्या पवित्र आश्रमात राहिला. पूर्वदिशेला क्षेत्रसीमांचे रक्षण करू लागला. .म्हणून सिध्देश्वर लिंगापासून आग्नेय दिशेला सर्वसिध्दीदायक सिध्दवुंᆬड अस्तित्वात आहे. भूतनाथानेही दिव्यसहस्रवर्षे विश्वकर्मेश्वराजवळ दीर्घकाळ तप आचरले. अंगठयाच्या टोकावर उभा राहून तो निश्चल मनाने निराहार राहून बाहू वर करून हृदयात शिवाचे ध्यान करत राहिला. अशाप्रकारे तो तप करत असता शिव प्रत्यक्ष प्रकट झाला आणि तो पिनाकधारी मृदु वाणीने भूतनाथाला म्हणाला,"हे भूतेश, तुझ्या मनातील इच्छा सांग. मी ती अविलंब पुरी करेन."

भूतनाथ म्हणाला,"तुझ्या दर्शनाहून अन्य कोणताही वर नाही. तुझी आराधना करत या गोकर्णक्षेत्री राहण्याची माझी इच्छा आहे." भूतनाथाचे तेबोलणे ऐकून संतुष्ट होऊन शंकराने म्हटले,"तथास्तु, भूतनाथ सर्व भूतांसह ( तुझ्या सहकार्‍यांसह) येथेच रहा. माझी नित्य सेवा करत या माझ्या क्षेत्रमण्डलाचे रक्षण कर. जसे कैलास शिखरावर त्याचप्रमाणे मी येथेही वास करेन. म्हणून तू नेहमी येथेच सर्व सिध्दी प्राप्त करशील."

असे म्हणून , हे राजा, भूतनाथाला वर देऊन भगवान्‌ शंभू कैलासावर गेले. अशाप्रकारे हे सर्व गणाधिप गोकर्णाचे रक्षण करत राहिले.