अध्याय ४१ ते ६०

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय ४१ - हरिहर मण्डपत्रय वर्णनम्‌

नारद म्हणाले,"त्या खरासुराला आपल्या मायेने ठार मारल्यावर देवांनी, ऋषीमहर्षींनी जनार्दना (विष्णु)ची स्तुती केली. आपल्या स्त्रीरूपाचा भंग केलेल्या दुसर्‍या भागाला पुरुषोत्तमाने तात्काळ एकत्र केले (पूर्ण स्त्रीरुप झाला) व रुद्रासमवेत पाताळात गेला. हे द्विजश्रेष्ठा, तेथे पाताळात महेश्वराबरोबर दोन दिवस राहून देवांनी केलेला हर्षनिनाद ऐकून तो देवकीसुत रुद्राला म्हणाला,"चल ठार मारलेल्या खराला पहा. हे देवेशा, माझ्या मायेने तुझा शत्रु ठार झाला. तेव्हा ऊठ, दैत्याचा निप्पात पहा."असे भगवान विष्णुने म्हटले असता तोभगवान्‌ रुद्र वैतरणीसमवेत पुन्हा वर आला. ज्या ठिकाणातून तो त्यावेळी वर आला त्या स्थानाला उन्मज्जन असे म्हटले जाते. उन्मज्जन तीर्थाच्या उत्तरेला प्रकाशमान आणि फार पवित्र असे नारायण(पुर) महान्‌ स्थान आहे. त्या पुराच्या पूर्व भागात असलेल्या शुभ असे हे उन्मज्जनी या नावाने ओळखले जाणारे असे तीर्थांमध्ये श्रेष्ठ आहे.वैतरणी नावाची पाताळात असलेली लोकपावन नदी हरिहराच्याबरोबर स्थित आहे. उन्मज्जन तीर्थाच्या पुढयात राहून तेथून निर्धास्तपणे सर्व तीथार्ंनी निर्माण केलेली दृश्य अदृश्य अशी ती महानदी कोटीतीर्थाकडे येऊन प्रसन्न होऊन पुढे ताम्रगौरीला मिळून नंतर समुद्रात प्रवेश करते. उन्मज्जन स्थानाजवळ वैतरणी नदीचे तीर्थ आहे. त्या ठिकाणी जो श्रध्देने स्नान करतो तो सर्व पापांतून मुक्त होतो. उन्मज्जन तीर्थात स्नान केल्यावर मनुष्य चंद्राप्रमाणे शोभून दिसतो. पूर्वी तेथे महाबलवान्‌ वसिध्द असा एलापुत्र नाग होता. उन्मज्जनाभोवती असलेल्या त्या वनाला एलावन असे नाव आहे (वेलचीचे बन) तेथे जाऊन जो नागाचे भक्तीपूर्वक पूजन करतो तो सर्व कामनांचे फळ नागाप्रमाणेच प्राप्त करतो."

संवर्तक म्हणाला,"हे ब्रह्मपुत्रा नारदा, तुझ्या मुखातून पाझरलेले कथामृत पिऊन मी तृप्त झालो नाही. तेव्हा पुन्हा एकदा हरिहराची कथा सांग."

नारद म्हणाले,"हे द्विजश्रेष्ठा, मी सांगतो ती कथा ऐक. त्या उन्मज्जनातून बाहेर ये. ते दोघे देव पुन्हा नारायणपुरात आले. सर्व जग आनंदित झाले. पापी खराला ठार मारलेले लोकांनी पाहिले. त्याला भस्मीभूत झालेले पाहून विस्मयचकित होऊन महेश्वर शंकरांनी म्हटले,"देवदानवांना अवध्य असलेल्या त्या पाप्याला तू ठार मारलेस, त्याची शौर्यकथा मला सांग. हे थोर बुध्दिमान्‌, मला मोठी उत्कंठा लागून राहिली आहे."

विष्णुने म्हटले,"अत्यंत गुप्त असे कसेही व कुठेहीसांगावयाचे नाही. तरीही तुझे कुतूहल मी संपवतो, ऐक. हे सुरश्रेष्ठा, माझी माया त्रैलोक्याला मोहविते. तिने हे चराचर विश्व व्यापले आहे. माझ एक अंश मी स्त्रीरुप केला आहे. रूप आणि प्राकाराने अनिश्रि्‌चत (दाखविता न येणारे), लोकांना मनोहर वाटणारे, उमेपेक्षा शतपट रूपसौभाग्य प्राप्त असे हे स्त्रीरूप आहे. कामवासनेने पीडित असा तो राक्षस तिला पाहून मोहीत झाला. हे देवश्रेष्ठा, उमेला सोडून तो पापकर्मा यथेच्छ, जोशपूर्ण क्रीडा करेन असे मानू लागला. पण त्यावेळी माझी प्रकृति (माया) तो विसरला. दुष्टात्म्याने तिला "तू कोण आहेस, कोणाची आहेस?"असे विचारले. तिने म्हटले,"प्रकृति नावाची मी कन्या आहे. मला अनुरुप व अनुकूल असा एक स्वामी, पती मी शोधत आहे." तिचे बोलणे ऐकून विवेक नष्ट झालेला कामी राक्षस तिला म्हणाला,"हे भद्रे,त्रैलोक्याच्या ऐश्वर्याचा उपभोग घेत असलेला मीएक स्वामी आहे. माझ्याबरोबर येऊन त्रैलोक्यैश्वर्याचा उपभोग घेणारी हो. हे मृगाक्षी, मी तुला अनुरूप आहे व तू मला, तेव्हा तू माझी भार्या हो." तेव्हा ती म्हणाली,"ठीक आहे, मी तुझी पत्नी होईन. पण मी काय सांगते ते ऐक. शंकराने दिलेला वर जर तू मला देशील तरच मी भार्या व्हायला तयार आहे." असे तिने म्हणता क्षणीच त्या दुरात्म्याने तो वर तिला दिला. तो वर घेऊन हे शंकरा, ती माझी मायारूप देवी त्याच्या मस्तकावर हात ठेवून "भस्म हो" असे त्याला म्हणाली. असे देवीने म्हटल्याबरोबर तुझा शत्रु खर तात्काळ भस्म झाला. हे महादेवा, दुसरे ऐक, त्या दुरात्म्याच्या वधाचा आम्ही सर्व देवांनी विचार करून उपाय केला आहे. पवित्र रुपाने त्याच्याजवळ जाऊन मी म्हटले,"स्ववृंᆬतनम्‌ नावाचा फार मोठा असा अथर्ववेदातील वैदिक मंत्र आहे. या मंत्राने, हे खर, शंकरांची आराधना कर. तुझ्या स्तुतीने सन्तुष्ट होऊन जे तिला हवेअसेल ते तुला निःसंशय देईल. या मंत्राने, हे दैत्येन्द्रा, रुद्रही विलयाला जाईल."

तेव्हा ते बोलणे ऐकून खरासुर तपश्चर्या करू लागला. त्या मंत्राने, हे देवेशा, जो कोणी तुझी पूजा करेल, तुझ्या कृपेने त्याचा मृत्यु निश्चितपणे होईल. माझ्यावर मोहीत झालेल्या त्याने तसे केले. अवध्य अशा त्या दुरात्म्याच्या वधासाठी हा उपाय मी केला. आता तुझी उत्कंठा संपेल. त्याचे ते बोलणे ऐकून भुवनेश्वर शंकर विष्णुला म्हणाला,"तुझे ते रूप मला दाखव." त्यावर मधुसूदन विष्णुने शंकराला ते रूप दाखविले. अखिल विश्वाचा तत्वज्ञानी असूनही ते रूप पाहून महादेव अत्यंत विस्मयचकित झाला. "काय हे रूप, काय हे धैर्य किंवा काय हे लावण्य!" असे म्हणत पुनःपुन्हा रुप पाहून विस्मित झाला. कामवासनेने पीडित केशवाला म्हणाला,"हे जनार्दना, या रुपाने मला वर." असे म्हणून शंकरानी त्या रुपाला आलिंगन दिले व देव नरनारी(अर्धनारी नटेश्वर) झाला. क्रीडासक्त असे ते दोघे एकत्वाला प्राप्त करते झाले. हे ब्राह्मणश्रेष्ठा, त्याच पुरात एकमूर्तिधर असे दोघे प्रसन्नपणे यथेच्छ वास्तव्य करीत राहिले. अद्यापि त्या ठिकाणी गेले असता काम (वासना) वृध्दिंगत होतो. गोकर्णामध्ये ते पुर (गाव किंवा शहर) स्वर्गासमान असून श्रेष्ठ आहे. गोकर्णामध्ये हरिहरपुर या नावाने सन्मानित आहे. त्या ठिकाणी हितैषी लोकांनी दाने द्यावीत त्यामुळे अक्षय असे पुण्य प्राप्त होते यात शंका नाही. तेथे दिलेली दाने देवभोगांप्रमाणे असतात. त्र्याहत्तर कुळातील लोकांबरोबर दाता स्वर्ग प्राप्त करतो. शिवविष्णुंची कथा जोपर्यत जगात प्रचलित राहील तोपर्यंत दिव्यभोगांनी युक्त असा मनुष्य स्वर्गातून हलणार नाही. शुक्लपक्षाच्या द्वादशीला, श्रवण नक्षत्रात, विशेषतः श्रावण महिन्यात शिवविष्णुंची पूजा करणे पुण्यप्रद होते. एकादशीच्या दिवशी निराहार राहून यादेवांची भक्तीपूर्वक यथाविधी पूजा केली असता त्या दोघांचे प्रिय कार्य त्याचवेळी अक्षय राहते. अशाप्रकारे जो या काळात तेथे कार्य करतो तो सर्व पापांतून मुक्त होऊन विष्णुलोकात जातो. स्वर्गासमान अशा हरिहरपुरामध्ये जे दान दिले असता किंवा अर्पण केले असता एक कोटि इतके पुण्य प्राप्त होते. पुण्यपवित्र व पापनाशक त्रिमण्डप हरिहरपुरामध्ये आहेत. त्यांची नावे क्रमाने मी सांगतो. वैराग्य देणारा, ज्ञानद-ज्ञान देणारा मुक्तिद-मुक्ति देणारा. दोन्ही देवांच्या पुढयातील रम्य व मुनींनी सेवन केलेला असा मण्डप अहे. उत्तरदिशेला स्थित असलेला जो मण्डप तो वैराग्य देणारा आहे. ब्रम्हचर्याने युक्त, उपवास करून, एकाग्रतेने, विधीनुसार अष्टाक्षर मंत्र एक लक्षवेळा जो यथाशक्ती, यथाबुध्दी जपेल त्याचे पुण्य एक कोटीएवढे होईल. मोठे ज्ञान प्राप्त होऊन विष्णुचे सान्निध्य प्राप्त होते. नंतर नैऋत्य दिशेलास्थित असलेला मण्डप मुक्तीद आहे. तेथे जे पापी मानव मृत्यु पावतात ते सर्व पापातून मुक्त होतात व श्रेष्ठ पदाला जातात. तेथे एक महिना जो ब्रह्मचर्यव्रतयुक्त वास करेल, तो सर्व पापांतून मुक्त होऊन सत्यवादी व जितेन्द्रिय होतो. तसेच त्याचे सात जन्माचे पाप नष्ट होते. त्या ठिकाणी जो स्त्री वा पुरुष एक महिना उपास करून राहिल तो सर्वपापमुक्त होऊन शेवटी त्याला मुक्ती मिळेल. जेव्हा एखादा विरक्त पुरुष वा स्त्री किंवा एखादी तपस्विनी प्रायोपवेशनामध्ये दीक्षा घेऊन या मुक्तीमण्डपामध्ये दर्भशय्या करून हरिहराची ही पुण्यकथा ऐकेल व नामसंकीर्तन करेल,"ॐकारगम्यमान ॐसर्वसाक्षिणम्‌ अद्वयम्‌" असे म्हणत त्या निर्मल, शांत, निरूप, अनामय अशा नारायणाचे निरंतर ध्यान करेल तो मरणकाळी परम तेजाजवळ जाईल व योग्य काळाने पुरुषोत्तम त्याच्याजवळ येऊन दयेने आपला हात मस्तकावर ठेवतो वब्रह्मोपदेश देतो तसेच आपले दर्शन देतो. जो माणूस हे रोज भक्तीपूर्वक पठण करेल त्याचे त्रिजन्मात केलेले पाप नष्ट होईल. कोटीतीर्थावर अभिषेक केला असता पुण्य प्राप्त होते. मनुष्याला पुण्य प्राप्त होऊन ब्रह्मज्ञान प्राप्त होते.