श्री क्षेत्र गोकर्ण प्रवास मार्गदर्शन

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

श्री क्षेत्र गोकर्ण प्रवास मार्गदर्शन

श्री क्षेत्र गोकर्ण हे तीर्थक्षेत्र कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात कुमठा तालुक्यामध्ये शाल्मली गंगावली आणि अधनाशिनी या नद्यांच्यामध्ये अरबी समुद्राच्या कुशीत वसलेले असून कर्नाटक राज्याची राजधानी बंगलोर पासून ४५३ कि.मी. आणि मंगलोर शहरापासून २३८ कि.मी. अंतरावर आहे.

कामाधनाशिनी नदी अर्थात कामेश्वर अधनाशिनीवरील पुल पार करुन गेल्यानंतर गोकर्ण क्षेत्री प्रवेश केला की आपल्या डाव्या हाताला सुरु होतो शतशृङग पर्वत. या शतशृंङग पर्वताच्या कडेने आपण बसस्थानकावरून श्री मंदिराच्या राजमार्गावर यायच्या आधी रस्त्यावर एका हॉटेल समोरील घराच्या मागच्या अंगणात श्री दत्तात्रेय आश्रम होता त्या ठिकाणी आता फक्त औदुंबराच्या वृक्षाखाली सती अनसुयेची उघड्यावर पडलेली मूर्ती असून समोर विहिरीत रुपांतर झालेले दत्तात्रेय तीर्थ आहे. राजमार्गाच्या तोंडावरच उजव्या हातास श्री वेंकटेश मंदिर आहे. राज मार्गावर प्रवेश केला असता उजव्या हातास एका घरामध्ये दोन तीन खोल्या सोडून आहे संवर्तकेश्वर लिंग आणि अर्थवट विहिरीत रुपांतर झालेले संवर्तकेश्वर तीर्थ. थोडे पुढे गेलो असता एक मोठा अश्वत्थ वृक्ष लागतो या वृक्षाच्या डाव्या हातास सूर्येश्वर आणि सूर्य तीर्थ आहे. अश्वत्थ वृक्षाच्या उजव्या बाजूस मार्कण्डेश्वर आहे. याच्या जरा पुढे धर्मेश्वर आहे. परत फिरून राजमार्गावरून मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली की उजव्या हाताला महाबळेश्वराचा प्रचंड रथ दिसतो. या रथासमोर आहे कुबेरेश्वर. कुबेरेश्वराला लागूनच पृथ्वीतलावरील एकमेव असलेले द्विभुज बटु गणेश मंदिर आहे. गोकर्ण पुराणातील प्रथेप्रमाणे पट्टविनायकाचे प्रथम दर्शन घेऊन नंतरच श्री महाबळेश्वराच्या आत्मलिंगाचे दर्शन घेतल्यास यात्रेचे फळ मिळते असा संकेत आहे. परंतु आता या द्विभुज बटु गणेशाचे दर्शन घेऊनच यात्रेकरू महाबळेश्वराच्या भेटीला जातात. द्विभुजा गणेशाच्या उजव्या हाताला आहे रावणेश्वर लिंग, त्याच्या थोडे पुढे कुंभकर्णेश्वर लिंग, कुंभकर्णेश्वर लिंगाचे दर्शन घेऊन परत श्री मंदिराच्या रस्त्याला लागलो की इंद्रेश्वर. इंद्रेश्वराच्या समोर रस्त्याच्या दुसऱया बाजूस आहे विभिषणेश्वर. विभिषणेश्वराचे दर्शन घेऊन आपण श्री मंदिराच्या आवारात प्रवेश करतो.

 

प्रवेश द्वारातून डाव्या हाताला वळलो की पहिला नमस्कार दत्तात्रेयाला तद्नंतर गौतमेश्वराला आणि कंदबेश्वराला, पुढे गेलो की ईश्वराच्या वृषभध्वजाला नमस्कार आणि श्री मंदिराच्या मुख्य गाभाऱयात प्रवेश. गाभाऱयात उजव्या हाताला दुर्गादेवी, डाव्या हाताला श्री गणेश आणि समोर ईश्वराने पुजलेले आत्मलिंग. हे आत्मलिंग नेहमीच्या लिंगापेक्षा थोडे वेगळे आहे. सर्व लिंगामध्ये खाली पिंडी व वर शाळूंखा असते. मात्र आत्मलिंगात शाळूंखा सात पिंडींमध्ये बंदिस्त आहे आणि वरच्या पिंडीत मध्यभागी एक छिद्र असून या छिद्रातून बोटाद्वारे आपण आत्मलिंगाच्या अग्रभागाला स्पर्श करू शकतो. तीर्थप्रसाद घेऊन प्रदक्षिणेसाठी बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम लागते चण्डेश्वर. चण्डेश्वराला वंदन करून बाहेरच्या प्रांगणात आहे रुद्रयोनी अथवा आदी गोकर्ण मंदिर, पाच-सहा पायऱया उतरून खाली गेलो की चहुबाजूने पाण्याने वेढलेल्या आदी गोकर्णेश्वराचे दर्शन होते. आदी गोकर्णाला वंदन करून पुढे शास्त्रsश्वराची भेट घायची. या शास्त्रsश्वरालाच साक्षी महादेव असेही म्हणतात. प्रचलित कथेप्रमाणे आपण गोकर्णाला गेलो किंवा न गेलो असा कधी वाद निर्माण झाल्यास या शास्त्रsश्वराची साक्ष अंतिम मानली जाते. त्यामुळे चण्डेश्वराबरोबरच साक्षी महादेवाला वंदन अनिवार्य आहे. पुढे जाऊन क्षेत्रपालाला वंदन त्यानंतर वीरभद्राला वंदन आणि ताम्रगौरीच्या मंदिराच्या आवारात प्रवेश. ताम्रगौरीला वंदन करून प्रदक्षिणा करून बाहेर येताना मंदिरासमोरील एक बंद दरवाजा उघडल्यास ताम्रकुंडाचे दर्शन होते. या ताम्रकुंडात अस्थि विसर्जनाला अतिशय महात्म्य आहे.

ताम्रगौरीच्या मंदिरातून बाहेर पडून आपण श्री महाबळेश्वराची प्रदक्षिणा पूर्ण करण्याआधी डाव्या हातास आहे इंद्रेश्वर तीर्थ. या तीर्थाचे दर्शन घेऊन ज्या मार्गाने प्रवेश केला त्याच मार्गाने बाहेर येऊन समुद्राच्या रस्त्याने वाटचाल सुरु केली की या रस्त्याच्या उजव्या बाजूस प्रथम वंदन सरस्वीतीश्वराला, त्यानंतर अमृतेश्वराला. पुढे रस्त्याच्या मधोमध एका छोट्याशा बैठकीवर पेटी मध्ये बंद असलेल्या सागरेश्वराचे दर्शन होते. तेथून पुढे समुद्राच्या दिशेने मार्गक्रमण करताना उजव्या हाताच्या पहिल्या गल्लीत पितृस्थालेश्वर आणि विधूत पापस्थालेश्वर यांचे मंदिर लागते. या दोन्ही मंदिरांमध्ये अखंड श्राद्धकर्मे चालू असतात. त्यामुळे आपल्याला थोडे बिचकायला होते. पितृस्थालेश्वर अथवा सुरभिस्थापित लिंग कुलुपबंद असते. त्यामुळे या मंदिराच्या ब्राह्मणाकडून चावी घेतल्यासच आपल्याला या लिंगाचे दर्शन होऊ शकते. या गल्लीत पुढे गेल्यानंतर ताम्रगौरी नदीवरील पुलापलीकडे लागते गोकर्ण क्षेत्रीची प्रसिद्ध रुद्रभूमी. या रुद्रभूमीवर स्मशानकालीचे मंदिर आहे. थोडे पुढे गेल्यानंतर सुब्रमण्येश्वर आणि सुब्रमण्य तीर्थ आहे. जवळपास कुठेतरी हरिश्चद्रेश्वर आहे. या पाऊल वाटेने परत फिरून आपण परत एकदा समुद्राच्या रस्त्याला येतो आणि थोड्याच वेळात विशाल अरबी समुद्राचे दर्शन होते. समुद्र दर्शनाच्या आधीच्या उजव्या हाताच्या रस्त्याने वर गेलो की अंदाजे तीन एक किलोमीटरवर रुद्रपाद आणि पराशर तीर्थ आहे.

रावणेश्वराच्या लिंगा जवळून एक रस्ता डोंगरावर जातो. या रस्त्याच्या डाव्या हातास प्रथम वंदन अथर्वेश्वराला, नंतर सामवेदेश्वराला, त्यानंतर यजुर्वेदेश्वराला. यजुर्वेदेश्वरासमोर एक छोटीशी गल्ली आहे. त्या गल्लीच्या डाव्या हातास आहे गायत्री तीर्थ, थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या हातास सावित्री तीर्थ, त्यापुढे डाव्या हातास सरस्वती तीर्थ व त्याच्या पुढे डाव्या हातासच ब्रह्म तीर्थ आणि ब्रह्म तीर्थाच्या विश्वामित्र तीर्थ. या ठिकाणी उभे राहिले असता उजव्या हातास ताम्रगौरीच्या सागराबरोबरच्या मनोहर संगमाचे विहंगम दृश्य दिसते. याच पाऊल वाटेने परत फिरून आपण यजुर्वेदेश्वराजवळून डोंगरावर चढण्यास सुरुवात केली की डाव्या हाताला ऋग्वेदेश्वराला वंदन करून चालायला सुरुवात केली की अर्ध्या-एक किलोमीटर नंतर आपण शतशृङग पर्वतावर पोहोचतो.

शतशृङग पर्वतावर पहिला लागतो विश्वामित्र आश्रम आणि विश्वामित्रेश्वर, त्याच्या समोर ब्रह्मेश्वराचे मंदिर आणि ब्रह्मेश्वर. थोडे खाली उतरल्यास मणीभद्र मंदिर. मणीभद्राचे दर्शन घेऊन परत एकदा ब्रह्मेश्वरावरून शतशृङगावर चढण्यास सुरुवात केली की वरूण तीर्थ, पांडव तीर्थ, अनंत तीर्थ, सूर्य तीर्थ, जटायु तीर्थ. जटायु तीर्थाच्या कपारीतून वर आल्यानंतर सरळ पुढे गेल्यानंतर कमंडलु तीर्थ आणि गोगर्भेश्वर. गोगर्भावरून पाऊल वाटेने समोर चालायला सुरुवात केली की अर्ध्या-एक किलीमीटरवर उजव्या हाताला एक पाऊल वाट फुटते. ही पाऊल वाट पकडली की आपण पोहचतो दुर्वास तीर्थाला. दुर्वास तीर्थाचे दर्शन करून परत एकदा माघारी फिरून मूळ पाऊल वाटेने समोर चालत शतशृङग पर्वत उतरून गेलो की आपण पोहचतो सुमित्रेश्वराला. सुमित्रेश्वराच्या पुढे भीमकुंड, भीमकुंडावरून उजव्या हाताला वळलो की गंगाधार तीर्थ अर्थात सुमित्रेश्वराच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन शंभू देवाने दिलेल्या गंगा नदीचे उगमस्थान, त्यापुढे वसिष्ठ तीर्थ आणि वसिष्ठेश्वर. वसिष्ठ तीर्थाचे दर्शन घेऊन परत सुमित्रेश्वराच्या रस्त्याने कोटी तीर्थाच्या दिशेने पुढे गेल्यास काही अंतरावर वरदेश्वर लिंग, त्याच्या पुढे अगस्ती तीर्थ. अगस्ती तीर्थावरून आपण खाली उतरलो की उजव्या हातास पट्टविनायक अथवा चिंतामणी विनायक. त्याच्या जरापुढे कोटी तीर्थालगतच शंकर-नारायण अथवा ईश्वर-मोहीनी आणि थोडे पुढे गेल्यानंतर कामेश्वर मठ. कामेश्वर मठाच्या समोर कोटी तीर्थामध्ये मुक्ती मंडप, मुक्ती मंडपातून कोटी तीर्थाच्या मधोमध असलेल्या कोटेश्वराचे दर्शन. (फक्त पट्टीचे पोहणारे या कोटेश्वरावर अभिषेक करू शकतात.) कोटेश्वराचे दर्शन घेऊन मुक्ती मंडपावरून परत फिरून शंकर-नारायणावरून मागे फिरल्यास प्रथम कृष्णाश्रमाला वंदन, परत कोटी तीर्थालगतच्या रस्त्याने वाटचाल, थोड्या अंतरावर उजव्या हाताच्या गल्लीत नृसिंह मंदिर, नृसिंहाला वंदन करून परत कोटी तीर्थाचा रस्ता, या रस्त्यावर थोड्याच अंतरावर काळभैरवाचे मंदिर. काळभैरव मंदिरावरून सरळ पुढे गेल्यानंतर परत एक छोटीशी गल्ली आणि या गल्लीत हनुमंतेश्वर. गल्लीतून परत येऊन कोटी तीर्था डाव्या बाजूस न वळता आपण सरळ चालत गेलो की उजव्या हाताला व्यवस्थित बांधलेले एका बंगल्यामधील दुर्गा कुंड. दुर्गाकुंडावरून सरळ गेलो की नागतीर्थ, नागेश्वर आणि परत फिरून आपण कुबुरेश्वरावरून महाबळेश्वराच्या रथाजवळ राजमार्गाला येऊन मिळतो.

हमरस्त्याने आपण भद्रकाली मंदिराकडे येतो. भद्रकालीवरून पुढे गेलो की मूळ रस्त्याला उजव्या हातास एक फाटा फुटतो. या रस्त्याने गेलो की आपल्याला गणेश तीर्थ, केतकी विनायक, केतकी तीर्थ, केतकीश्वर आणि कलकलेश्वर मंदिरे लागतात. परत फिरून मूळ रस्त्याने पुढे वाटचाल सुरु केली की आपण वैवाहिक पर्वतावरून सरळ पुढे जातो. थोड्या अंतरावर रस्त्याच्या डाव्या हातास वळलो तर प्रथम ताम्रगंगेचे उगमस्थान आणि त्याच्या समोर आपल्याला ताम्रतल पर्वत दिसतो. ताम्रतल पर्वताच्या रस्त्यावर उजव्या हाताला अग्नी कुंड लागते. परत फिरून आपण मूळ रस्त्याला आलो की उजव्या हाताला शेतातील बांदावरून अर्धा-एक किलोमीटर चालत गेल्यानंतर चक्रखंडेश्वर आणि चक्रतीर्थ लागते. 15-20 मिनीटांच्या चालीनंतर कपिलातीर्थ लागते. परत फिरून हमरस्त्याला आलो की उजव्या हाताच्या रस्त्याने अंदाजे तीन-एक किलोमीटरवर गंगेचा उगम आहे. परत फिरून मूळ हमरस्त्याला आलो की आपण मेरू पर्वतावर पोहचतो. पर्वताच्या पायथ्याशी गंगा मंदिर आहे. येथे दरवर्षी ईश्वराचा गंगेशी विवाह लावला जातो. पर्वतावरून आपल्याला गंगेचे अतिशय मनोहर दर्शन होते. गंगा मंदिराच्या थोडे पुढे जह्मू तीर्थ आहे.

या व्यतिरिक्तही असंख्य तीर्थे व लिंगे आजही अप्रकाशीत आहेत.