संपर्क व माहिती...

सन १९८४ मध्ये गोकर्ण महाबळेश्वराच्या सान्निध्यात महारुद्राभिषेक करण्याचा योग आला आणि त्यावेळचे आमचे मुख्य पुरोहीत होते कै. विघ्नेश्वर दिक्षित. तीन दिवसांचा सोहळा संपल्यानंतर गुरुजींनी गोकर्ण क्षेत्रावर मराठीत चांगले पुस्तक नसल्याची खंत व्यक्त करून काहीतरी लिहिण्याची मला सूचना केली. पंचवीस वर्षांनी अचानक गोकर्ण महाबळेश्वराचे बोलावणे आले आणि या योगास कारणीभूत ठरले ते म्हणजे वैश्यवाणी समाजाचे कुलगुरु हळदीपूर मठाधिपती श्री श्री वामनाश्रम स्वामीजी.

स्वामिजींच्या आदेशावरून आठ दिवसांचा गोकर्ण दौरा ठरविला. या दौऱयाआधी ऐकीव माहिती, मिळतील ती मराठीतील, हिंदीतील गोकर्णाची माहिती देणारी पुस्तके जमा करून एक छोटेसे टंकलिखीत तयार केले. गोकर्ण क्षेत्री जाताना अचानकपणे माझा बालमित्र आणि व्यावसायिक फोटोग्राफर श्री. बाळा राऊळ यांनी स्वतहून येण्याचे कबूल केले. तो नुसताच आला नाही, तर अतिशय महागडा कॅमेराही बरोबर घेऊन आला. अर्थात् तीर्थक्षेत्री जायचे तर सहचारिणीशिवाय जाणे अयोग्य झाले असते आणि सौभ्याग्यवतीनेही आपल्या सर्व शारिरीक व्याधींना गुंडाळून ठेवून गोकर्णास जाण्याची तयारी केली. तयारी सोपी नव्हती कारण व्हीडोओ शूटींग करण्याचे ठरविलेलेच होते. आधीच्या अनुभवावरून शूटींग करावयाचे म्हटले तर ईश्वर लिंगे मनुष्य विरहित वाटू नयेत यासाठी सोबत वेगवेगळी कृत्रिम फुले, रांगोळीचे सामान, पुजेची सामुग्री, छोटेमोठे पडदे, साफसफाईचे सामान इत्यादी घ्यावे लागले. सामान वाढल्यामुळे सहाय्यक म्हणून सोनुर्लीचे पांडुंग बांदीवडेकर आणि मधु वेर्णेकर धाऊन आले.

गोकर्ण क्षेत्री प्रवेश केला आणि साक्षात् गोकर्ण महाबळेश्वरच प्रसन्न झाल्याने, अब्जावधी वर्षापूर्वी घडलेल्या, ऐकलेल्या पुराण कथांना पुष्टी देणारी, साक्षी देणारी एकापेक्षा एक अनुपम्य अशी ईश्वर लिंगे आणि तीर्थकुंडे समोर प्रगट होत गेली. गोकर्ण क्षेत्रीच्या ब्राह्मण वर्गाला या पुराणकालीन इतिहासाची बऱयापैकी माहिती आहे, याचीही प्रचिती आली.

या संपूर्ण दौऱयात दिक्षित गुरुजींचे चिरंजीव श्री. प्रभाकर दिक्षित यांनी अनन्य भक्तीने आमच्यासाठी संपूर्ण वेळ देऊन जास्तीत जास्त लिंगदर्शने घडविली. चक्रखंडेश्वराचे मंदिर एकांतात असल्याने ते कुलुपबंद असते. परंतु आमच्यासाठी जवळजवळ 82 वर्षांच्या ब्राह्मणाने ते दूरवर येऊन आम्हाला उघडून दाखविले. त्याचप्रमाणे सुरभी लिंगासमोर सतत पितृतर्पणांची कामे चालू असतात. त्या मंदिराचे ब्राह्मणांनी स्वतहून गर्भगृहाची चावी दिली. उमा महेशाच्या मंदिराची चावीही अशीच योगायोगाने मिळाली. दौऱयाअंती गोकर्ण क्षेत्रीचे पुरोहीत श्री. भालचंद्र दिक्षित यांनी गोकर्ण पुराणाचा संस्कृत खंडच हातात दिला. हा खंड बघून डोळेच पांढरे झाले आणि आयुष्यात सर्वप्रथमच आपल्याला संस्कृत येत नसल्याने मन विषिण्ण झाले. परत एकदा गोकर्ण महाबळेश्वर हाकेला धाऊन आले आणि प्राध्यापिका सौ. सुहासिनी बाक्रे यांनी गोकर्ण खंडाचे मराठीत भाषांतर करण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे एकतर ऐकीव गोष्टींना लेखी सबळ पुरावे मिळाले आणि दुसरे आपण गोकर्ण क्षेत्र फारसे काही पाहीले नाही याचाही प्रत्यय आला.

याही गोष्टीला जवळ जवळ वर्ष होत आले परंतु लिहिण्याचा योग येत नव्हता आणि पुनरश्च गोकर्ण महाबळेश्वर धाऊन आले आणि हे पुस्तकरुपी संकेतस्थळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. अनुभवाचा भाग म्हणजे हे कार्य करताना दरवेळी काहीतरी न सुटणारे प्रश्न निर्माण व्हायचे आणि आपल्या अडचणी स्वयं महाबळेश्वरच दूर करीत आहेत याचाही प्रत्यय पदापदी येऊ लागला. मनात इच्छा झाली आणि महाबळेश्वराने ती पूरी केली नाही असे कधीच घडले नाही.

कै. विघ्नेश्वर दिक्षित गुरुजींच्या इच्छेप्रमाणे गोकर्ण क्षेत्रावरील छापिल पुस्तक नाही पण हे मराठी भाषेतील पुस्तकरुपी संकेतस्थळ भाविकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे संकेतस्थळ फक्त गोकर्ण महाबळेश्वराच्या इच्छेमुळेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्याचे मी माध्यम आहे. त्यामुळे या संकेतस्थळातील चुकांची जबाबदारी सर्वस्वी माझी व जे जे बरोबर आहे, सत्य आहे त्याचे सर्व श्रेय गोकर्ण महाबळेश्वराकडेच आहेत आणि या संकेतस्थळाचे सर्वाधिकार संपूर्णपणे श्री गोकर्ण महाबळेश्वराकडेच आहेत.